'आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा...
नवीन वर्षात ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळा पुन्हा एकदा सिने-नाट्य विश्वातील गुणवंतांचे कौतुक करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने मनोरंजन विश्वात पुरस्कार पटकावण्यासाठी कलाकार आणि तंत्रज्ञांमध्ये चुरस निर्माण झालेली पाहायला मिळेल. ‘मराठी कलांचा, गुणांचा प्रतिभा प्रशंसा सोहळा…’ अशी बिरुदावली मिरवत, २०२५ मध्येही हा पुरस्कार सोहळा भव्य-दिव्य स्वरूपात पार पडणार आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत मनोरंजन विश्वात तसेच कलाकार-तंत्रज्ञांसोबत रसिकांच्या मनात आपले मानाचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे.
विजेत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांच्या मनात नवा जल्लोष, नवी उर्जा, नवी उर्मी निर्माण करणाऱ्या या सोहळ्यासाठी पुन्हा मराठी नाट्य-सिनेविश्वातील कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्र येणार आहेत. ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ मध्ये सहभागी होण्यासाठी नाटक आणि चित्रपट निर्मात्यांना आपल्या कलाकृतीसाठी प्रवेश अर्ज भरून पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुसऱ्या वर्षातील ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक’ पुरस्कार सोहळ्यात गीत-नृत्याच्या माध्यमातून सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळासोबत भालजी पेंढारकरांपासून सचिन पिळगांवकरांपर्यंत मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांना मानवंदना देण्यात आली होती. तिसऱ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक’ पुरस्कार सोहळ्यात अनेक सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी विजेत्यांसाठी पुरस्कारांची रक्कम वाढवण्यात आली असून, ती आता १३,५०,००० रुपये करण्यात आली आहे. यावर्षीच्या सोहळ्यात चार नवीन विभागांचा समावेश करण्यात आला आहे.
यंदा चित्रपटांसाठी २२ ऐवजी २४ विभाग, तर नाटकांसाठी १६ ऐवजी १८ विभाग ठरवण्यात आले आहेत. नव्याने समाविष्ट विभागांमध्ये चित्रपटांसाठी ‘सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक’ आणि ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता’, तर नाटकांसाठी ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ आणि ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’ हे चार विभाग आहेत.
‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’साठी १ जून २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीत सेन्सॉर किंवा प्रदर्शित झालेले चित्रपट आणि नाटकांचे प्रवेश अर्ज पाठवता येतील. अर्ज स्वीकारण्यास ५ एप्रिल २०२५ पासून सुरुवात होईल, तर ५ जून २०२५ ही अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख आहे.
पुरस्कार सोहळ्यासाठी aaryanssanman.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध असून, ते ऑनलाइन भरता येतील. तसेच अधिक माहितीसाठी ०८१४९०४६४६२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
मूळ पुण्यात असलेल्या ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्’ने विविध क्षेत्रांमध्ये आपला विस्तार केला आहे. ऑटोमोबाईल, पेट्रोकेमिकल्स, सोलर पॉवर, गोल्ड रिफायनरी, हॉस्पिटॅलिटी, ग्रीन एनर्जी, एव्हिएशन, फार्मास्युटिकल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फायनान्स आणि ॲग्रिकल्चर या क्षेत्रांत आर्यन्स ग्रुप कार्यरत आहे. मनोरंजन विश्वातील सिनेमा-नाटक आणि मराठी कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक’ पुरस्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली आहे.