*'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला : लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत*
महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. आता या चित्रपटातील पहिले गाणे 'पांडुरंग' प्रेक्षकांच्या भेटीला आहे आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सची निर्मिती असणाऱ्या 'देवमाणूस' चित्रपटातील हे भक्तीगीत संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे आहे.
सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजात गायलेले, रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केलेले आणि प्रसाद मदपुवार यांनी लिहिलेले 'पांडुरंग' हे गाणे श्रद्धा आणि भक्तीच्या प्रवासाला समर्पित करणारे आहे. महेश मांजरेकर यांची वारी यात्रेतील दृश्ये या गाण्यात पाहायला मिळत असून, ती त्यांच्या भावनिक व आध्यात्मिक प्रवासाचे दर्शन घडवणारी आहेत.
या गाण्याच्या अनुभवाबद्दल सोनू निगम म्हणतात, ‘’पांडुरंग हे माझे पहिले वारी गाणे आहे आणि या गाण्याचा एक भाग होण्याचा आनंद मला आहे. जेव्हा रोहन-रोहन यांनी स्टुडिओत मला हे गाणे ऐकवले, तेव्हा मी त्याच्या आध्यात्मिक प्रभावाने भारावून गेलो. या गाण्यात भक्तीमय प्रवासाची भावना आणि भगवंत विठ्ठलाच्या भक्तांची अढळ श्रद्धा अतिशय सुंदररित्या साकारली आहे. मी त्यांना सांगितले, मला या गाण्यातील खरी भावना समजावून द्यावी, कारण यात काही पारंपरिक शब्द आहेत, जे माझ्यासाठी नवीन होते. मला खात्री आहे, की माझे हे विठ्ठलाला अर्पण केलेले भावपूर्ण गाणे, जसे मला भावले तसेच ते श्रोत्यांच्या हृदयालाही स्पर्श करेल.”
संगीतकार रोहन रोहन म्हणतात, “पांडुरंगासाठी आमची पहिली पसंती सोनू निगम यांनाच होती. कारण या गाण्यासाठी शांत, भक्तिरसात न्हालेला आवाज आम्हाला हवा होता, जो सोनू सरांच्या स्वरांमध्ये अप्रतिमरित्या उमटतो. हे गाणे रेकॉर्ड करणे ही आमच्यासाठी एक अद्भुत प्रक्रिया होती आणि प्रेक्षकांना हे जादुई संगीत अनुभवायला मिळेल, याचा आम्हाला आनंद आहे.”
हे गाणे युनिव्हर्सल म्युझिक इंडियाद्वारे वितरित केले जाणार असून हे गाणे सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.
लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.