*‘लव फिल्म्स’चा ‘देवमाणूस’ हा चित्रपट म्हणजे समीक्षकांनी प्रशंसलेल्या 'वध'ची मराठी पुनर्कल्पना*
निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या सर्वाधिक प्रशंसा वाट्याला आलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या- संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या अभिनयाने नटलेल्या 'वध' या चित्रपटाचे मराठी रूपांतर ‘देवमाणूस’मध्ये पुन्हा मांडण्यात आले आहे. २०२२ साली प्रदर्शित झालेल्या 'वध' चित्रपटाच्या झालेल्या कौतुकानंतर, निर्मात्यांना या चित्रपटाचे अस्सल मराठमोळे रूपांतर करण्याची संधी मिळाली- जी भाषांतराच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने मराठी घराघरांत घडणारी कथा बनली आहे.
‘देवमाणूस’ हा चित्रपट केवळ एक पुनर्कथन नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याशी विणली गेलेली एक हृदयस्पर्शी पुनर्कल्पना आहे. ‘लव फिल्म्स’चा पहिला मराठी चित्रपट असलेल्या या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे हे प्रमुख भूमिकेत आहेत आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देओस्कर यांनी केले आहे. या चित्रपटाने त्याच्या प्रभावी टीझरदवारे आणि ‘पांडुरंगा’ या भावपूर्ण गाण्याने चित्रपटासंदर्भातील प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, ज्यामुळे प्रेक्षक या चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
*या चित्रपटाच्या लेखिका नेहा शितोळे यांनी सांगितले,* “आम्ही मराठी प्रेक्षकांना त्यांची स्वत:ची, जिवाभावाची कथा वाटेल, अशी कथा सांगण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. वारकऱ्यांचे भावपूर्ण चित्रण, पैठणी साडी विणणाऱ्याचे मूलतत्त्व, एक फक्कड लावणी आणि इतर पारंपरिक लोककला हे सारे या चित्रपटाच्या कथेत आहे. अशा प्रकारे मराठमोळा वारसा असलेल्या समृद्ध घटकांचा समावेश आम्ही या चित्रपटात केला आहे, जो रंजक तर आहेच, त्याचबरोबर कथेसोबत विरघळून जाणारा आहे. ही कथा रूपांतरित असूनही त्यांच्या स्वतःच्या मातीत घडली आहे ही भावना प्रेक्षकांमध्ये दाटून येण्याकरता हा सारा प्रयास आहे, ज्यामुळे त्यांच्या विविध भावभावना उचंबळून येतील आणि त्याच वेळी त्यांचे रंजनही होईल."
*दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देओस्कर म्हणाले,* “‘देवमाणूस’ ही महाराष्ट्राच्या आत्म्यातून जन्माला आलेली कहाणी वाटावी अशी आमची इच्छा होती. महेश सर आणि रेणुका मॅडम यांच्या पात्रांच्या दिसण्यातून आणि जाणवण्यापासून चित्रपटाच्या टोनपर्यंत कथेतील इतर साऱ्या बारकाव्यांची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतली आहे आणि पडद्यावर दिसणारे हे सारे चित्रण त्यांच्या सांस्कृतिक मुळांपर्यंत पोहोचेल, अशी अत्यंत आदरपूर्वक रचना करण्यात आली आहे. ज्यांनी ‘वध’ चित्रपटात सर्वोच्च सिनेमॅटिक मानकांची पूर्तता केली जाईल, हे सुनिश्चित केले होते, त्या निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांचे सहकार्य याही वेळी मिळाल्याने, आम्हांला ‘देवमाणूस’ चित्रपटाकडेही तितकेच बारकाईने लक्ष देता आले, ज्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो. वेधक नाट्य आणि परंपरेच्या सम्यक मिलाफासह, ‘देवमाणूस’ हा चित्रपट महाराष्ट्राच्या चिरस्थायी चैतन्याला केला गेलेला एक सिनेमॅटिक सलाम आहे, जो मोठ्या पडद्यावर एक अविस्मरणीय अनुभव देताना, प्रेक्षकांनाही उत्तम कलेच्या रसास्वादाची अनुभूती मिळेल, हे सुनिश्चित करतो.”
‘लव फिल्म्स’चे सादरीकरण असलेल्या ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग आहेत. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी ठिकठिकाणच्या सिनेगृहांत प्रदर्शित होईल.