स्टार प्रवाहच्या कलाकारांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
गिरीजा प्रभू म्हणजेच कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेतील कावेरी
गुडीपाडव्याच्या सणादिवशी सकाळी लवकर उठून गुढी उभारायची तयारी, गोडाधोडाचा नैवेद्य करायचा आणि सहकुटुंब जेवणाचा आनंद लुटायचा हे दरवर्षी नित्यनेमाने करते. सणानिमित्ताने गोड जेवणावर ताव मारता येतो. यंदाचा गुढीपाडवा माझ्यासाठी खुपच खास आहे. माझी नवी मालिका कोण होतीस तू, काय झालीस तू लवकरच स्टार प्रवाहवर सुरु होतेय. या मालिकेसाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे यंदा संकल्प हाच आहे की आणखी चांगलं काम करायचं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतल्या गौरी आणि नित्यावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. माझ्या नव्या मालिकेवर प्रेम करावं हीच अपेक्षा आहे.
मृणाल दुसानिस म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील नंदिनी
माझी मुलगी पहिल्यांदाच भारतामधले सण साजरे करणार आहे. त्यामुळे तिच्यासाठी गुढीपाडव्याचा सण खास असेल. गुढीची पूजा, श्रीखंड-पुरीचा नैवेद्य आणि कैरीचं पन्ह हे न चुकता दरवर्षी बनवलं जातं. यंदा संकल्प असा केलाय की धकाधकीच्या आयुष्यातून येईल तो क्षण छान जगायचा. खूष रहाण्याचा प्रयत्न करायचा, तब्येतीची काळजी घ्यायची आणि मुलीला जास्तीत जास्त वेळ द्यायचा.
विजय आंदळकर लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील पार्थ
मराठी नवीन वर्ष नेहमीच माझ्यासाठी नवी उमेद, नवी प्रेरणा घेऊन येतं. मागच्या वर्षी ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्यात अश्या अनेक गोष्टी मी या नवीन वर्षी करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेला उत्तम प्रतिसात मिळतोय. त्या निमित्ताने माझं एक नवीन कुटुंबच तयार झालंय. सेटवर सुद्धा आम्ही कलाकारा गुढी उभारुन उत्साहात गुढीपाडवा साजरा करणार आहोत.
राज हंचनाळे प्रेमाची गोष्ट मालिकेतील सागर कोळी
घरी पारंपरिक पद्धतीने गुढीची पूजा केली जाते. गेल्या चार-पाच वर्षांपासून मी कुठल्या ना कुठल्या शोभायात्रेत सहभागी होतोय. शोभायात्रेच्या निमित्ताने नवीन वर्षाची सुरुवात प्रेक्षकांना भेटून होते याचा आनंद वेगळाच आहे. काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळते. माझ्या बायकोला पारंपरिक पद्धतीने सण साजरे करायला आवडतात. ती उत्तम पुरणपोळ्या बनवायला देखिल शिकली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला दरवर्षी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. नवीन वर्षाचा संकल्प हाच असेल की मानसिक आणि शारीरिक रित्या फिट रहाणं. सोबत अध्यात्माची देखिल जोड हवी याचं महत्व देखिल मला पटलं आहे. त्यामुळे योगा, ध्यानधारणा यावर लक्ष केंद्रित करणार आहे.
विवेक सांगळे (लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील जीवा)
मी लालबाग-परळ भागात रहात असल्यामुळे प्रत्येक मराठी सण उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येक सण खूप जवळचा आहे. सण जसा जवळ येतो तशी उत्सुकता वाढत जाते. आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षी गुढीपाडव्याला गुढी उभारण्यासोबतच शोभायात्रा आणि सोबत पालखी देखिल निघते. त्यामुळे त्याची देखिल लगबग असते. पताका आणि कंदील लावून संपूर्ण सोसायटी सजवली जाते. शूटिंगचं वेळापत्रक सांभाळून मी आवर्जून यात सहभागी होतो. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मी गिरणगावात जन्मलो जिथे प्रत्येक सण जल्लोषात साजरा केला जातो. यावर्षीचा संकल्प हाच असेल की जास्तीत जास्त घरच्यांना वेळ देणार आहे आणि फिटनेसकडे लक्ष देणार आहे.