*तामडी चामडी’ आणि ‘गुलाबी साडी’नंतर, धीरुचे ‘जेवलीस का’ – मराठी पॉपच्या नव्या लाटेचा नवा सूर!*
जेवलीस का?' हा फक्त एक प्रश्न नसून एक भावना आहे. प्रेमाने,काळजीने, सहज विचारला जाणारा हा प्रश्न आता एक तुफानी पॉप अँथॅम बनणार आहे. संगीतकार-गायक धीरु त्याच्या नवीन पॉप सिंगल 'जेवलीस का?'मधून संगीतविश्वात धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे. धीरूने आपल्या वैशिष्टयपूर्ण स्टाईलने या साध्या प्रश्नाला हायपरपॉप, रेट्रो फंक आणि डान्स-पॉप च्या फ्युजनमधून एका भन्नाट गाण्याच्या स्वरूपात. आपल्यासमोर आणलं आहे. पारंपरिक मराठी संवेदनांना एक आधुनिक, फ्युचरिस्टिक टच असा अनोखा मिलाफ यात अनुभवायला मिळेल. या गाण्याचा मूड मज्जेशीर आणि शब्द पटकन ओठावर रुळतील असे आहेत.
धीरूच्या शब्दात सांगायचं तर ,''जेवलीस का हे हुक, गाण्यासाठी बरेच दिवस माझ्या डोक्यात रेंगाळत होतं. आपल्या रोजच्या जीवनातील संवाद जितका सहज असतो तितकंच हे गाणंही मला सहज सोप्प पण युथफूल करायचं होतं. 'तामडी चामडी’ आणि ‘गुलाबी साडी’सारखी गाणी मराठी पॉप म्युझिकच्या यशस्वी बदलाची नांदी ठरली आहेत. स्वतंत्र कलाकार आता चौकटी मोडून नवे प्रयोग करत आहेत. श्रोत्यांना आता भाषेइतकाच गाण्याचा फिल पण महत्त्वाचा वाटतो. पंजाबी आणि हिंदी संगीत आधीच ग्लोबल स्तरावर पोहोचलं आहे. मराठी पॉपलाही तिथं पोहोचायला वेळ लागणार नाही. 'जेवलीस का ''हे माझं त्या दिशेने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे."
धिरूचा संगीतप्रवास विलक्षण आहे. या स्वतंत्र पॉप म्युझिकसोबतच, त्याने ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘आर्टिकल १५’, आणि ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ यांसारख्या चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत निर्मितीत मोलाचे योगदान दिले आहे. ‘उरी’च्या पार्श्वसंगीताला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. तसेच, त्याने ‘ट्यूजडे ’ या कान्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेल्या लघुपटासाठी संगीत दिले आहे. धिरेंद्र मूलकलवार या नावाने काम करणारा हा कलाकार आता 'धीरु ' म्हणून नव्या युगातील मराठी पॉप संगीताच्या प्रवासात पुढे सरसावला आहे.
"आज पारंपरिक संगीत कंपन्यांच्या चौकटी मोडल्या जात आहेत.आता सोशल मीडिया आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्समुळे कोणत्याही भाषेतील संगीत जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतं आणि हिच माझ्यासारख्या स्वतंत्र कलाकारांसाठी सर्वात मोठी संधी आहे," असं धीरु म्हणतो.
संगीत धिरूचे, गीत अक्षयराजे शिंदे यांचे, आणि मिक्सिंग-मास्टरिंग प्रशांत नायर यांचे असलेलं हे धमाकेदार गाणं ७ फेब्रुवारीपासून सर्व प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध झालं आहे.