*लेखक बनणार कॉमेडीयन!*
*हास्याचा धमाका घेऊन येत आहे ‘ऑलमोस्ट कॉमेडी’*
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आपल्या दर्जेदार व मनोरंजक आशयासाठी प्रसिद्ध आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ते नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘कॉफ़ी आणि बरंच काही’ ‘बॅाईज’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांद्वारे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता प्रेक्षकांच्या मनोरंजनात आणखी भर घालण्यासाठी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट एक धमाकेदार संकल्पना घेऊन येत आहे. प्रेक्षकांना हास्याच्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट सज्ज झाले आहे.
एव्हरेस्ट हास्य मराठी प्रस्तुत ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ हा एक नवीन मराठी स्टँडअप कॉमेडी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा धमाकेदार कॉमेडी शो एव्हरेस्ट हास्य मराठी या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल. ज्यामध्ये मराठी मनोरंजन विश्वातील काही उत्कृष्ट लेखक प्रथमच स्टेजवर स्टँडअप कॉमेडी सादर करणार आहेत. चेतन डांगे, अमोल पाटील, चिन्मय कुलकर्णी, अक्षय जोशी आणि ऋषिकांत राऊत या लेखकांनी पूर्वी अनेक मनोरंजक कथा लिहून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता मात्र हे लेखक प्रत्यक्ष स्टेजवर येऊन आपल्या विनोदी किस्से सांगून प्रेक्षकांना हसवणार आहेत. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चे सूत्रसंचालन करून या हास्ययात्रेला चारचांद लावणार आहे. तिच्या अनोख्या अंदाजाने व सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंगत येईल.
प्रेक्षकांना हसवण्याची जबाबदारी घेऊन हे लेखक आता कॅमेरासमोर येणार आहेत आणि त्यांच्या लेखणीप्रमाणेच त्यांची स्टेजवरील उपस्थितीदेखील प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ हा शो फक्त एक कॉमेडी शो नसून लेखकांच्या कलागुणांची एक मजेशीर सफर असणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची ही नवीन संकल्पना प्रेक्षकांसाठी नव वर्षातील खास भेट ठरेल. ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करेल हे नक्की!
एव्हरेस्ट एंटरटेमेंटचे संस्थापक संजय छाब्रिया म्हणतात, “स्टँडअप कॉमेडी हा मनोरंजनाचा एक वेगळा आणि प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होणारा फॉरमॅट आहे. म्हणूनच ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ हा नवा प्रयोग, नवी संकल्पना आम्ही घेऊन आलो आहे. लेखकांना स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणण्याचा हा एक रोमांचक प्रयोग आहे, आणि आम्हाला खात्री आहे की हा शो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”