Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारं 'फसक्लास दाभाडे’मधील 'दिस सरले' गाणं प्रदर्शित!*

 *लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारं 'फसक्लास दाभाडे’मधील 'दिस सरले' गाणं प्रदर्शित!*


*सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार*



‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. ज्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे. या चित्रपटाच्या गाण्यांना आणि टीझरला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. विशेषतः ‘यल्लो यल्लो’ गाण्यावर दाभाडे कुटुंबीयांनी जल्लोष साजरा केला असून हे गाणं सोशल मीडियावर, लग्नात प्रचंड गाजत आहे. या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


‘फसक्लास दाभाडे’ मधील नुकतेच लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारे ‘दिस सरले’ हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात लग्नातील प्रत्येक भावनिक क्षणांचा एक सुंदर कोलाज पाहायला मिळत आहे. रुखवत तयार करण्यापासून नवरीच्या पाठवणीपर्यंत प्रत्येक प्रसंग या गाण्यात उत्कृष्टपणे मांडला असून प्रत्येकाच्या मनातील भावना आणि लग्नातील हास्यविनोद दिसत आहे. विशेष म्हणजे यात मिताली मयेकर दिसत असून या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. यात नेमकं त्यांचा नातं काय असेल, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. अमितराज यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन  यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर हे गाणं हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे. 


निर्माते भूषण कुमार म्हणतात," ‘दिस सरले’ हे गाणं प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयाला स्पर्श करणारे आहे. लग्नातील भावनिक क्षण आणि हास्यविनोदाची गुंफण या गाण्यात उत्तमरित्या मांडली गेली असून हे गाणं प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या आयुष्यातील खास आठवणींशी नक्कीचं जोडेल, याची आम्हाला खात्री आहे.’’


निर्माते आनंद एल राय म्हणतात, "लग्नातील रुखवतापासून पाठवणीपर्यंतचा प्रत्येक क्षण ‘दिस सरले’ या गाण्यात प्रभावीपणे मांडला गेला आहे.  लग्नासारख्या उत्सवातील आनंद आणि भावनांचा हा अनोखा संगम रसिकांच्या हृदयाला नक्कीच भिडेल".



दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, लग्न हे दोन जीवांच्या एकत्र येण्याचा सोहळा असतो जो एक अत्यंत भावनिक अनुभव असतो, प्रत्येक कुटुंबासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असतो. या गाण्याच्या निमित्ताने प्रत्येक लग्नासाठी एक वैश्विक भावना तयार करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. मला खात्री आहे लग्नं झालेल्या आणि होऊ घातलेल्या प्रत्येकाला हे गाणं आपलंसं वाटणार आहे. 


टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.