Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न झाला ‘मिशन अयोध्या'चा दैदिप्यमान ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न!*

*छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न झाला ‘मिशन अयोध्या'चा दैदिप्यमान ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न!*



संभाजीनगर(प्रतिनिधी) : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची महिमा सांगणारा व विचार मांडणारा ‘मिशन अयोध्या' हा चित्रपट २४ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. भारताचा इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असणारा आर. के. योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित आणि समीर सुर्वे दिग्दर्शित ‘मिशन अयोध्या' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, ७ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला.



आत्तापर्यंत चित्रपटांमध्ये हिंदू धर्मातील साधुसंतांना चुकीच्या पद्धतीने चित्रित केले गेले. त्याच पद्धतीने मुस्लिम धर्मगुरु किंवा ख्रिश्चन धर्मगुरु विरोधात असे दाखवले गेले नाही. मात्र आज हिंदू धर्मातील साधुसंता बद्दल चांगले दाखविण्यात येत आहेत, असे म्हणत त्यांनी, 'मिशन अयोध्या' मराठी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. नुकताच छत्रपती संभाजीनगर शहरातील एका भव्य मॅालमध्ये 'मिशन अयोध्या' या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगच्या प्रसंगी महंत रामगिरी महाराज बोलत होते. भविष्यामध्ये यासाठीही संघर्ष करावा लागेल, असेही महाराज म्हणाले. यावेळी व्यसपिठावर आमदार अनुराधाताई चव्हाण(आमदार), चित्रपटाचे निर्माते, कृष्णा शिंदे, योगीता शिंदे, दिग्दर्शक समीर सुर्वे, विरुपाक्ष महाराज, प्रल्हाद महाराज नवल, बद्री पठाडे, सुनील जगताप, रामचंद्र नरोटे, कृष्णा पाटील उकिर्डे, पद्माकर पडूळ, राम शिंदे, मधुकर महाराज, राधाकिशन पठाडे, विवेक ढोरे, रवी करमाडकर, बाबू महाराज आदींची उपस्थिती होती.



या चित्रपटाचे निर्माते म्हणून जबाबदारी कृष्णा शिंदे आणि योगिता शिंदे यांनी सांभाळली आहे. तर कथा कृष्णा शिंदे यांची असून पटकथा आणि संवाद लेखन समीर सुर्वे यांनी केले आहे. या चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी ट्रेलर लॉंच सोहळ्याला हजेरी लावली होती. संपूर्ण संभाजीनगर मिशन अयोध्यामय झाले होते. सर्व रस्त्यांवर पदोपदी मिशन अयोध्याचे बॅनर्स झळकत असल्याने शहरवासियांमध्ये कमालीचे कुतूहल तयार झाले आहे. या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने चित्रपट रसिकांची उपस्थिती लाभली होती तसेच रामगिरी महाराज यांच्या अनुयायांनीही बहुसंख्येने गर्दी केली होती. ज्ञानोबा - तुकाराम माऊलींचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांनी ‘जय श्री राम' नामाचाही जयघोष केला. तसेच यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि चौकात चित्रपटाची फलकबाजी करण्यात आली होती. तसेच महंत रामगिरी महाराज यांच्या आगमनाचे फलकही जागोजागी लावण्यात आले होते.



चित्रपटाविषयी ......

मिशन सैनिकांचे असते, मिशन अतिरेक्यांचे असते. मग मिशन एका शिक्षकाचं का नसावं? असामान्य महानायकांचा इतिहास वाचत असताना आपलंही एक पान इतिहासात असावं, ही इच्छा मनाशी बाळगून आयुष्य जगणाऱ्या एका सामान्य शिक्षकाची एक असामान्य कथा आहे. अजित देशमुख हा इतिहास विषयचा शिक्षक असूनही छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या चरित्रावर व्याख्याने गाजवणारा प्रभावी वक्ता सुद्धा आहे. त्यांनी एका मिशनला पुढचे आयुष्य समर्पित  करायचे ठरवले आहे. ज्याचं नाव आहे "मिशन अयोध्या".

साधारण पाचशे वर्षाच्या एका अभूतपूर्व संघर्षानंतर भारतातील अयोध्यामध्ये सरते शेवटी श्री राम जन्मभूमी मंदिर उभारले गेले, त्या घटनेने देशमुख सर प्रभावित होतात. रामजन्मभूमी मंदिर उभारलं गेलं, पण पुढे काय? मंदिर उभारलं पण श्रीरामाच्या विचारांचं काय? असे त्यांच्यासमोर बरेच प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांनी स्वतः ते बेचैन होतात आणि प्रभू श्रीराम ही त्यांची अस्वस्थता बनते कारण ते ज्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना आपला आदर्श मानतात त्या आदर्शांचा आदर्श श्रीराम आहे. अयोध्यात निर्माण झालेले भव्य मंदिर रामराज्याची सुरुवात असायला हवी, पुढच्या पिढ्यांना आदर्श राजा रामाचा इतिहास आपण सांगायला हवा. श्रीराम हा संपूर्ण विश्वाचा आहे त्याला कोणताही धर्म, जात-जमात अपवाद नाही. श्रीराम हा कोणाच्या द्वेषाचा, तिरस्काराचा विषय नसावा. त्याला सर्वांनी स्वीकारायला हवं असं त्यांचं आदर्श चरित्र आहे आणि हा विचार सर्व समाजात पोहोचवणं, तो पुढच्या पिढ्यात रुजवणे आणि रामराज्याकडे वाटचाल करणे हेच मिशन अयोध्या आहे.


अत्यंत वेगळा विषय घेऊन येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी मिशन अयोध्या चित्रपटगृहात दाखल होत असून हा चित्रपट रसिकांनी चित्रपटगृहातच पहावा असे आवाहन कलावंत तंत्रज्ञानी केले आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.