Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’नंतर सचित पाटील करणार "असंभव" चित्रपटाचे दिग्दर्शन*

 *‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’नंतर सचित पाटील करणार "असंभव" चित्रपटाचे दिग्दर्शन*



सध्या मराठी सिनेसृष्टीत एकाच चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे, तो म्हणजे ‘असंभव’. हा मराठी सिनेसृष्टीतील पहिला वहिला चित्रपट आहे ज्याचं शुटिंग नैनीतालमध्ये सुरु आहे. नैनीतालच्या ० ° आणि -३° सेल्सियस सारख्या गोठवणाऱ्या थंडीच्या वातावरणात सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट, संदीप कुलकर्णी आणि पुष्कर श्रोत्री या सिनेमाचं शुटिंग करीत आहेत.या चित्रपटाबद्दल आणखी एक खास बाब समोर आली आहे, ती म्हणजे मल्टी टॅलेंटेड अभिनेता, सचित पाटिल ‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’ चित्रपटांनंतर आता ‘असंभव’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. यासोबत सचितनेच या सिनेमाची पटकथा देखील लिहिली आहे. एवढंच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने सचित पाटिल निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करतोय.



या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सचित पाटिलसोबत त्यांचा जिवलग मित्र पुष्कर श्रोत्री या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतोय. सिनेमाबद्दल अभिनेता पुष्कर श्रोत्री ,,अतिशय उत्साही आहेत, याबद्दल बोलताना ते म्हणाले, “जेव्हा या चित्रपटाची गोष्ट कपिल भोपटकर आणि सचित पाटील यांनी मला ऐकवली तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली की चित्रपटाची कथा सचितच्या अंगात पूर्णपणे भिनली आहे. सचित हा माझा अनेक वर्षांपासूनचा खूप जीवलग मित्र आणि माझ्या कुटुंबाचा एक भाग असल्यामुळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असताना आमच्यातल्या मैत्रीचा आणि आम्हा दोघांच्या चित्रपट विषयक कलात्मक विचारांचा एकत्रित असा फायदाच "असंभव"साठी करून घ्यायचा, हे आम्ही ठरवलं. 



आणि नैनिताल मधलं चित्रीकरण करत असताना चित्रपटासाठी आम्ही दोघांनी त्याचा पुरेपूर वापर करून घेतला. आज हा चित्रपट ज्याप्रकारे आकार घेत आहे, त्यातून पुन्हा ही गोष्ट सिद्ध झाली की समविचारी जुने मित्र जर एखाद्या चित्रपटासाठी एकत्र आले, तर तो चित्रपट सर्व बाजूने समृद्ध होऊ शकतो.

‘असंभव’ या चित्रपटामुळे नितीन प्रकाश वैद्य - सचित पाटील यांची मुंबई-पुणे फिल्म एंटरटेनमेंट आणि शर्मिष्ठा राऊत - तेजस देसाई यांची एरिकॉन टेलिफिल्मस ह्या दोन्ही निर्मिती संस्था पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. ‘वळू’, ‘नाळ’, ‘एकदा काय झालं ’, ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ ते ‘लाईक आणि सबस्क्राईब’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव गाठीशी असलेल्या नितीन प्रकाश वैद्य यांची भक्कम साथ या चित्रपटाला लाभणार आहे.


‘असंभव’ चित्रपट आणि सचितबद्दल निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणाले की, “माझी आणि सचितची अनेक वर्षांपासून एकत्र काम करण्याची इच्छा होती, तो योग जुळून आला ‘असंभव’च्या निमित्ताने. कथा ऐकून ठरवलं की या चित्रपटाला योग्य न्याय द्यायचा असेल, तर निर्मिती आपणच करायला हवी. सचितचा कलात्मक दृष्टिकोण आणि माझा चित्रपट निर्मिती क्षेत्रातील अनुभव याची उत्तम भट्टी जमल्यामुळे आम्ही ‘मुंबई-पुणे फिल्म्स एन्टरटेन्मेंट’ या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली. माझं आणि सचितचं ट्युनिंग एकदम मस्त आहे. 



कलेसंदर्भात त्याला काय अपेक्षित आहे हे मला कळतं, आणि योग्य बजेटमध्ये काम कसं करायला हवं हे त्याला उत्तम रित्या कळतं. आमच्या जोडीला निर्माते म्हणून शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई हे देखील आहेत.” आता ‘असंभव’ हा चित्रपट रहस्यपट आहे की थरारपट, या कलाकृतीत काही नवं गूढ पाहायला मिळणार की एखाद्या जुन्याच विषयाशी याचे धागेदोरे जुळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.  या सगळया प्रश्नांच्या उत्तरांसाठी आणि या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार त्यासाठी प्रतिक्षा आहे ती चित्रपट प्रदर्शित होण्याची. हा चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, तोपर्यंत ‘असंभव’चं रहस्य उलगडणं असंभवच आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.