*राजीव पाटील फिल्म प्रोडक्शन निर्मित नवकोर नाटक 'हाऊसफुल' रंगमंचावर दाखल*
*'हाऊसफुल' सज्ज होतंय रंगमंच हाऊसफुल्ल करायला*
*प्रेमाचा बहर आणि हशांचा पाऊस करणार रंगमंच 'हाऊसफुल', नवंकोर नाटक सुरु*
सध्या प्रेक्षकवर्गाचा कल हा रंगमंचाकडे अधिक वळला आहे. अनेक दर्जेदार नाटकं रंगमंच गाजवताना दिसत आहेत. या यादीत आता आणखी एका विनोदी नाटकाची एंट्री झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.
"नाट्यभिन्न रुचेर्जनस्य बहुध्यापक समराधनम:" या संस्कृत उकलीच्या अर्थाप्रमाणे प्रेक्षकांना खळखळून हसवणारे आणि त्यांना नाटक पाहण्याची रुची निर्माण करुन समाधान देणारे एक नवीन कोरं विनोदी नाटक व्यावसायिक रंगमंचावर पदार्पण करत आहे. 'हाऊसफुल' असे नाटकाचं नाव आहे. हास्याने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास हाऊसफुल हे नाटक सज्ज झालं आहे.
'राजीव पाटील फिल्म प्रॉडक्शन'च्या अंतर्गत हाऊसफुल या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. रोमँटिक लव्ह-स्टोरीचा अँगल असलेलं हे नाटक प्रासंगिक विनोदाच्या माध्यमातुन दोन तास लोकांचं निखळ मनोरंजन करणार आहे. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक म्हणून महेश रोहिणी यांनी बाजू सांभाळली आहे. तर निर्माते राजीव पाटील यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. तर अभिनेता सौरव कपडे, सागर पळशीकर, प्रतीक्षा बारवकर, शितल करंजे,संभाजी बारबोले, तेजस्विनी साळुंके, महेश रोहिणी ही कलाकार मंडळी विनोदाची निराळी शाळा या नाटकाद्वारे भरवताना दिसणार आहेत.
नाटकाचे भव्यदिव्य सेट्स गणेश राऊत आणि सुरज वांजळे यांनी बनवले असुन या नाटकाचे संगीतही मंत्रमुग्ध करुन सोडणार आहे. हाऊसफुल्ल या विनोदी नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग पुणे येथील कोथरूड आणि हडपसरमधुन होणार असुन नंतर अखंड महाराष्ट्रात याचे प्रयोग वेगाने सुरु होणार आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी रोमँटिक लव्ह स्टोरीच्या मार्फत रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी हे नाटक सज्ज होत आहे. उद्या म्हणजेच १७ डिसेंबरला हे नाटक सायंकाळी ५ वाजता यशवंत राव नाट्यगृह कोथरूड येथे सुरु होणार आहे.
या नाटकाबाबत बोलताना निर्माते राजीव पाटील असे म्हणाले की, "सुरुवातीपासूनच मला नाटक पाहण्याची आवड होती आणि ते पाहत असताना आपणही कधीतरी एखादया नाटकाची निर्मिती करावं असं माझ्या डोक्यात होतं आणि तो योग या 'हाउसफुल' नाटकाच्या निमित्ताने जुळून आला. या नाटकाचे दिग्दर्शक महेश रोहिणी आणि त्यांच्या टीमने भेटून नाटक दाखवलं आणि मला या नाटकाची कन्सेप्ट फार आवडली. त्यानंतर मी 'हाऊसफुल' या नाटकाची निर्मिती करायचं ठरवलं".