Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*ज्येष्ठ अभिनेते मंगेश कदम यांना 'मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत' पुरस्कार जाहीर*

 *ज्येष्ठ अभिनेते मंगेश कदम यांना 'मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत' पुरस्कार जाहीर*


गेली तीस वर्षांहून अधिक काळ रंगभूमीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मंगेश कदम यांना यंदाचा  'मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत' पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटक, मालिका, सिनेमा अशा मनोरंजनाच्या सर्वच माध्यमात त्यांची अतुलनीय कामगिरी आहे. अधांतर, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, कब्बडी कब्बडी, तन-मन अशा कित्येक दमदार नाटकांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. केवळ दिग्दर्शनच नाही तर अभिनयातही त्यांनी मुशाफिरी केली. असा मी-असामी, के दिल अभी भरा नही, आमने-सामने, इवलेसे रोप अशा अनेक बहारदार कलाकृती आपल्या अभिनयाने त्यांनी लोकप्रिय केल्या आहेत. 


मनोरंजन विश्वातील त्यांच्या प्रदीर्घ सक्रिय कामगिरीची दखल समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीने झटणाऱ्या संस्थांपैकी अग्रणी असलेल्या “धि गोवा हिंदू असोसिएशन” या संस्थेनी घेतली आहे. या संस्थेमार्फत दिला जाणारा 'मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत पुरस्कार' यंदा श्री. मंगेश कदम यांना जाहीर झाला आहे. दिनांक २१ डिसेंबर,२०२४ रोजी सायंकाळी  ४ .३० ते  ८.३०  या वेळेत  प्राचार्य बी. एन.वैद्य सभागृह, सर भालचंद्र रोड, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व), मुंबई -४०० ०१४ येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. 



विशेष बाब म्हणजे मनोरंजन विश्वातील अत्यंत बहुमानाचा मानला जाणारा हा पुरस्कार या आधी श्री. मधुकर तोरडमल, श्रीमती सुधा करमरकर, श्री. भिकू पै आंगले, डॉ. श्रीराम लागू, श्री. जयंत सावरकर, डॉ. विजया मेहता अशा दिग्गजांना मिळाला आहे. आता या सन्मान यादीमध्ये अभिनेते- दिग्दर्शक मंगेश कदम यांच्याही नावाची मोहर उमटली आहे.  'मास्टर दत्ताराम चतुरस्त्र कलावंत पुरस्कार' दरवर्षी बहुआयामी कलावंतांना दिला जातो. यंदाचा, '२०२४' या वर्षातील पुरस्कार श्री. मंगेश कदम यांना प्रदान करण्यात येणार आहे.


हा पुरस्कार जाहीर होताच मंगेश कदम यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ''धि गोवा हिंदू असोसिएशन या अत्यंत मानाच्या संस्थेकडून पुरस्कार मिळणं ही कलाकार म्हणून खूप सुखावणारी बाब आहे. कारण आपल्या कामाचे कौतुक कुणाकडून होत आहे हेही महत्वाचे असते. जेव्हा मधुकर तोरडमल, सुधा करमरकर, डॉ. लागू, जयंत सावरकर, विजयाबाई अशा दिग्गजांचा सन्मान करणारी संस्था त्या पुरस्कारासाठी आपले नाव जाहीर करते तेव्हा तो कलाकार म्हणून आमचा बहुमान असतो आणि निश्चितच जबाबदारीही वाढते. मी अत्यंत विनम्रतेने आणि जबाबदारीने हा पुरस्कार स्वीकारत आहे. तसेच पुढेही माझ्याकडून रंगभूमीची आणि रसिक मायबापांची सेवा होत राहील, अशी मी खात्री देतो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.