Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राजेश खन्ना यांची अजरामर कलाकृती 'आनंद' मराठीमध्ये...

 राजेश खन्ना यांची अजरामर कलाकृती 'आनंद' मराठीमध्ये...

कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नाटकावर आधारित चित्रपट



१९७१मध्ये प्रदर्शित झालेल्या हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'आनंद' या हिंदी चित्रपटाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या चित्रपटात राजेश खन्ना यांनी साकारलेला आनंद मृत्यूनंतरही रसिकांच्या मनात अजरामर झाला. यातील अमिताभ बच्चन यांची भूमिकाही खूप गाजली. त्यामुळेच आजही हा चित्रपट टेलिव्हीजनर लागल्यास प्रेक्षक तो आवडीने पाहतात. रसिकांचा लाडका 'आनंद' आता मराठमोळे रूप लेऊन समोर येणार आहे. विघ्नहर्ता फिल्म्सने मराठी भाषेत 'आनंद' चित्रपट बनवण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. २९ डिसेंबर या राजेश खन्ना यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत मराठी 'आनंद' चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 



विघ्नहर्ता फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माते दिलीप शेट्टी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. आजवर नेहमीच संगीतप्रधान आशयघन चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे हेमंतकुमार महाले या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. वाद्यवृंद जगतात 'शोमॅन ऑर्गनायझर' म्हणून जगविख्यात असलेले हेमंतकुमार महाले यांच्या 'काळी माती' या चित्रपटाला एका वर्षात ४४४ उत्कृष्ट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून त्यातील १०६ पुरस्कार हे केवळ दिग्दर्शनासाठी आहेत आणि हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. याची दखल 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड', 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी'ने घेतली आहे. 'आनंद' प्रदर्शित झाल्यावर हृषिकेश मुखर्जी जेव्हा नाशिकला गेले होते, तेव्हा त्यांनी कुसुमाग्रजांना आपल्यासोबत 'आनंद' बघण्याची विनंती केली होती. इतकेच नव्हे तर सिनेमा पाहिल्यावर 'आनंद'चे नाट्यरूपांतर करण्याचा आग्रहही मुखर्जींनी कुसुमाग्रजांना केला होता. त्यानंतर आपला अस्तकाल एका बेहोश धुंदीत व्यतीत करणाऱ्या नायकाच्या कथेवर स्वत:च्या काव्यात्म प्रतिभेचे संस्कार करत कुसुमाग्रजांनी 'आनंद' नावाचे एक भव्य नाट्य लिहिले. या नाटकावर मराठी 'आनंद' आधारलेला आहे. 


'आनंद'मध्ये मराठी रसिकांच्या आवडीनिवडी आणि बदललेल्या काळानुरूप काही बदल करण्यात येणार असले तरी मूळ गाभा तसाच ठेवण्यात येणार आहे. हिंदी चित्रपट जिथे संपला, त्याच्या पुढेही मराठी 'आनंद' जाणार असल्याचे संकेत दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, कुसुमाग्रजांचे संवाद आणि कवितांचा योग्य वापर चित्रपटात करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'आनंद'चा लुक बदलला जाईल. सुमधूर संगीताची नेत्रसुखद नृत्यासोबत सांगड घातली जाईल. कथानकातील गाण्यांच्या जागा बदलून मराठी चित्रपटाचे नावीन्य जपण्यात येईल. काही नवीन व्यक्तिरेखा आणि दृश्यांचा समावेशही केला जाईल. 'आनंद'च्या नायिकेचे सादरीकरण सरप्राईज पॅकेज ठरेल. चित्रपटाच्या शेवटी एक उत्कंठावर्धक दृश्य वाढवण्यात येणार आहे. याखेरीज नयनरम्य लोकेशन्सवर 'आनंद'चे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचेही महाले म्हणाले.


राजेश खन्नांनी साकारलेल्या 'आनंद'च्या भूमिकेत कोणता अभिनेता असेल आणि त्यांना साथ देणाऱ्या अमिताभ यांनी सादर केलेला डॅा. भास्कर बॅनर्जी म्हणजेच बाबूमोशाय कोण बनणार? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे कलाकारांची निवड झाल्यावर समोर येतील. 'आनंद'मध्ये दिवंगत अभिनेते रमेश देव यांनी डॅा. प्रकाश कुलकर्णी यांची भूमिका केली होती. या चित्रपटात ती व्यक्तिरेखा कोणत्या कलाकाराच्या वाट्याला येते ते पाहाणेही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे कलाकारांची निवड करणे हे मोठे कठीण काम चित्रपटाच्या टिमसमोर आहे. डिओपी सुरेश सुवर्णा या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार आहेत. कला दिग्दर्शन निलेश चौधरी करणार असून, अविनाश-विश्वजीत ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची संगीतकार जोडी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.