*'सन मराठी'वरील 'आदिशक्ती' मालिकेतील स्नेहल शिदमच्या मार्गशीष महिन्यातील रंजक आठवणी*
मार्गशीष महिन्यात महालक्ष्मीचे व्रत केले जाते. या काळात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी अनेक सुवासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात. सामान्य स्त्री असो किंवा अभिनेत्री, अनेक स्त्रिया हे व्रत करत असतात. 'सन मराठी'वरील 'आदिशक्ती' या मालिकेत श्रद्धा ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहल शिदमही हे व्रत करते. महालक्ष्मीच्या या व्रताबद्दल स्नेहल म्हणते,
"लहानपणापासून मार्गशीष गुरुवारचे उपवास सुरू केले. लहानपणी आई जस साडी नेसून पोथी वाचायला बसायची, अगदी तसेच मी पण तिच्यासारखी साडी नेसून पोथी वाचायला बसायची. दर गुरुवारी मी साडी नेसायचे. त्यात अंतिम गुरुवारी आजूबाजूच्या घरातून बोलावलं जायचं, तिथे फळं, रुमाल, महालक्ष्मीची पोथी, वेगवेगळे गिफ्ट्स मिळायचे. म्हणूनच या मार्गशीष महिन्याचं आकर्षण झालं.आता जसजसे आपण मोठे होतो, तसतसे आपल्याला या सगळ्या गोष्टींचं महत्त्व कळतं. माझ्या घरी बऱ्याच वर्षांपासून आई हे व्रत करते, पण जेव्हा कधी ती गावी किंवा वारीला गेली असेल, तेव्हा महालक्ष्मीची पूजा मी करते. शूटिंगचा कॉल टाइम लवकर असला तरीही मी पहाटे लवकर उठून पूजा करते."
या पुढे स्नेहल म्हणते, "जेव्हा पासून मी अभिनय क्षेत्रात आले, तेव्हापासून मला पोथी वाचताना एक गोष्ट लक्षात आली की, त्यात जी महालक्ष्मीची गोष्ट आहे, ती मराठी आणि संस्कृतमध्ये आहे. त्यामुळे पोथी वाचताना नकळत कठीण व नवीन शब्द वाचले जातात. काही वेळासाठी भक्ती बाजूला ठेवून विचार केला तर पोथी वाचणं म्हणजे एक प्रकारचा व्यायामही आहे. ज्यांच्या मनात श्रद्धा नाही, त्यांनी नव्या शब्दांसाठी, आपल्या तोंडाच्या व्यायामासाठी, स्पष्ट उच्चारांसाठी तरी महालक्ष्मीची पोथी वाचली पाहिजे. हळूहळू मला या गोष्टी कळत गेल्या. जेव्हा घरात महालक्ष्मीची पूजा होते तेव्हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा असते, मन प्रसन्न आणि शांत होते. ही पूजा करणं म्हणजे फक्त देवीची पूजा करणं नाही, तर या सगळ्याला वैज्ञानिक गोष्टींचीही जोड आहे."