"नसीरुद्दीन सर यांचा अभिप्राय आणि कौतुक माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे": 'बंदिश बँडिट्स' गर्ल श्रेया चौधरी नसीरुद्दीन शाह यांच्या प्रतिक्रिया मिळाल्याने भारावली
'बंदिश बँडिट्स' सीझन 2 प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. आणि या शोच्या मुख्य अभिनेत्री श्रेया चौधरीकडे साऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. केवळ प्रेक्षक आणि शोच्या चाहत्यांकडूनच नाही तर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्याकडूनही तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.
पहिल्या सीझनमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी पंडितजींची भूमिका साकारली होती. परंतु खूप कमी जणांना माहिती आहे की नसीरुद्दीन शाह आणि श्रेयामध्ये सेटच्या बाहेरही खास नातं आहे आणि ती त्यांना मोठा आदर्श मानते.
नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबरच्या नात्याविषयी बोलताना आणि त्यांच्याकडून संदेश मिळाल्याबद्दल भावूक होत श्रेया चौधरी म्हणाली, "नसीरुद्दीन सर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेरणास्थान आहेत. मी पहिल्या सीझनमध्ये त्यांच्याकडून खूप काही शिकले आणि मला त्यांना जवळून पाहण्याची व त्यांच्यासोबत वर्कशॉप करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. त्यामुळे जेव्हा सरांनी दुसरा सीझन पाहिल्यानंतर मला संदेश पाठवला, तेव्हा तो सर्वोच्च सन्मान वाटला. त्यांच्या प्रतिक्रिया आणि कौतुक हे माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे. हे खूप समाधानकारक आणि आश्वासक आहे आणि मला वाटतं की अभिनेत्री म्हणून मी प्रगती करतेय."
श्रेया चौधरी लवकरच बोमन इराणी यांच्या दिग्दर्शनातल्या पहिल्या चित्रपटात, 'द मेहता बॉयज' मध्ये अविनाश तिवारीसोबत 2025 मध्ये झळकणार आहे.