Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे.. 'मनोमंच' ते 'रंगमंच'..

 *चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे.. 'मनोमंच' ते 'रंगमंच'..*



*स्वगत...स्वागत...सादरीकरण ..*

मराठी नाटक समूह या व्हॅट्सऍप समूहाच्या माध्यमातून आजवर प्रायोगिक नाट्य महोत्सव, नाट्यलेखन स्पर्धा, कोविड काळात पडद्यामागील कलावंतांना आर्थिक सहाय्य, पत्रलेखन स्पर्धां, विक्रमादित्य प्रशांत दामले गौरव सोहळा ह्यासाखे अनेक उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. 


चंद्रकांत कुलकर्णी या नामवंत दिग्दर्शकाच्या 'चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे' या त्यांच्या नाट्यप्रवासाच्या पुस्तकाची विक्रमी वेळेत द्वितीय आवृती प्रकाशित होत आहे. रंगभूमीवरच्या या गुणी आणि अभ्यासू दिग्दर्शकाच्या पुस्तकाच्या या दुसऱ्या आवृत्तीच्या निमिताने काही करावं ह्या उद्देशाने मराठी नाटक समूह पुढे सरसावला आणि त्याला जिगिषा आणि अष्टविनायक या संस्थांच्या निर्मात्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनच्या निमित्ताने चंदू सरांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या नाटकांमधील सादरीकरणे आणि पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन या दृष्टिने विचार करण्यात आला आणि सदर सोहळ्याची आखणी करण्यात आलेली आहे. 


या सोहळ्यासाठी खास वंदना गुप्ते, नीना कुलकर्णी, रोहिणी हट्टंगडी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले , सचिन खेडेकर, सुमीत राघवन ह्यांच्या बरोबरच नाट्य सिनेसृष्टीतील तसेच समाजातील अनेक नामवंत उपस्थित राहणार आहेत.


या कार्यक्रमात ‘राजहंस’ने प्रकशित केलेल्या ‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे’ या पुस्तकाचे अभिवाचन होणार आहेच त्या बरोबरच ‘हॅम्लेट’ या नाटकातील प्रवेश सुमीत राघवन करणार आहे. नीना कुलकर्णी ह्यांच्या सारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीने गाजविलेल्या ‘ध्यानीमनी’ नाटकातील उतारा स्वतः नीनाताई सादर करणार आहेत तर, ‘येळकोट’ ह्या नाटकातील प्रसंग संकर्षण कऱ्हाडे आणि आशुतोष गोखले सादर करणार आहेत.  त्रिनाट्य धारेतील ‘मग्न तळ्याकाठी’ मधील प्रवेश चिन्मय मांडलेकर आणि पूर्वा पवार सादर करणार आहेत तसेच कै.भक्ती बर्वे आणि अतुल कुलकर्णी ह्यांनी गाजवलेल्या ‘गांधी विरुध्द गांधी’ ह्या नाटकातील प्रवेश ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि दस्तुरखुद्द चंद्रकांत कुलकर्णी सादर करणार आहेत.



या  नाट्यप्रवासाच्या पुस्तकाचा आढावा दीपक करंजीकर आणि क्षितिज पटवर्धन हे दोन नामवंत आणि प्रतिभाशाली लेखक घेणार आहेत. तर अभिवाचन प्रतीक्षा लोणकर करणार आहे.साधारण दोन तास चालणारा हा सोहळा गुरुवार, २१ नोव्हेंबर रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा ह्या ठिकाणी सायंकाळी ५.४५ पासून सुरु होणार आहे.


रंगकर्मी ज्या रसिकांच्या जोरावर कार्यरत राहतो त्या रसिकांनी जास्तीत जास्त उपस्थित रहावे आणि  या सोहळ्याचा आस्वाद त्यांना घेता यावा, जुन्या काळात गाजलेल्या नाटकांतील प्रवेश पाहताना रमून जावे ह्यासाठी सदर सोहळा सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आलेला आहे. ह्या सोहळ्याच्या निमित्ताने हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक ह्या प्रकारच्या रंगकर्मीं बरोबरच रसिक प्रेक्षक उपस्थित राहणार असल्याने एक प्रकारचा रंगकर्मी मेळावाच यशवंत नाट्यगृहात होईल असा आशावाद मराठी नाटक समूहाने व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.