Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने केला १३०० भागांचा टप्पा पार !*

 *कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने केला १३०० भागांचा टप्पा पार !*


*“आज जे ब्रह्मांडनायक आहेत त्यांना साकारण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो” - अक्षय मुडावदकर*


कलर्स मराठी वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात  रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभत आहे. अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उध्दार करत, त्यांना उपदेश करत स्वामी समर्थ कसे सोलापूर येथील अक्कलकोट येथे पोहचले... कशी लोकांना त्यांच्या महानतेची प्रचिती येत गेली, अक्कलकोट येथील चोळप्पा महाराज, सेवेकरी सुंदराबाई, अक्कलकोटचे राजे मालोजीराव, या भक्तांनी स्वामीलीला अनुभवली आणि ते कसे कृतार्थ झाले, त्यांचे कसे नाते होते आणि या भक्तिमार्गात आणखी कोणकोणती माणसं श्री स्वामी समर्थांच्या कृपाछायेखाली आली हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये आजवर बघायला मिळाले. अक्कलकोट येथे स्वामींच्या वास्तव्याने वटवृक्षाखाली दोन दशके चैतन्य ऊर्जा नांदली ती कशी हे देखील प्रेक्षकांना रोजच्या रोज अनुभवता येत आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने यशाचा एक नवीन विक्रम स्थापित केला आहे. मालिकेने १३०० भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करून प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. स्वामी समर्थांच्या जीवनातील दिव्य कथा, त्यांच्या अलौकिक चमत्कारिक कार्यांचा प्रवास आणि त्यांच्या उपदेशांनी भरलेले अनेक प्रसंग यामुळे ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय झाली आहे.



याक्षणी बोलताना जय जय स्वामी समर्थ मालिकेतील स्वामी अर्थात अक्षय मुडावदकर म्हणाले," आज जय जय स्वामी समर्थ या मालिकेचे १३०० भाग पूर्ण होत आहेत. सर्व प्रथम या मालिकेशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो कारण  ४ वर्षांचा १३०० भागांचा यशस्वी प्रवास पुर्ण झाला आहे. एक टीम म्हणून प्रत्येकाचा यामध्ये मोलाचा वाटा आहे कारण हे कोणा एकट्यामुळे शक्य नाही. हे यश संपूर्ण टीमचे आहे. टीम सोबत मी रसिक प्रेक्षकवर्गाचे आभार मानतो कारण त्यांनी मालिकेच्या पहिल्या भागापासून मालिकेवर, कलाकारांवर आणि कलर्स मराठीवर भरपूर प्रेम केले. मला खूप छान वाटत आहे की, मी अशा एका प्रोजेक्टचा भाग आहे ज्याने एवढा मोठा टप्पा पार केला आहे. ही गोष्ट प्रत्येकाच्या नशिबात येईलच असे नाही. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आज जे ब्रह्मांडनायक आहेत त्यांना साकारण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. या मालिकेद्वारे मी आज घराघरात पोहोचलो लोकांनी मला भरभरुन प्रेम दिले. आम्ही आता १३०० भागांपर्यंत आलो आहोत स्वामींचा अलौकिक जीवनपट पाहता अजून खूप प्रवास बाकी आहे. स्वामींच्या अनेक अलौकिक लीला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रसिकांना हीच विनंती की, असेच आमच्यावर प्रेम करत राहा.स्वामींच्या अलौकिक लीलांचे साक्षीदार व्हा,जगणे समृद्ध करा"


या यशाच्या निमित्ताने मालिकेतील कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी एकत्र येऊन हा आनंद साजरा केला. तसेच, प्रेक्षकांचे आभार मानले, ज्यांच्या प्रेमामुळे ही मालिका सतत नवीन शिखरे गाठत आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेच्या यशस्वी प्रवासाच्या या टप्प्याबद्दल बोलताना संपूर्ण टीमने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. “स्वामी समर्थांच्या भक्तीतून प्रेरणा घेऊन आम्ही ही मालिका सुरू केली आणि प्रेक्षकांच्या अपार प्रेमाने हा प्रवास यशस्वी झाला आहे. हा टप्पा म्हणजे आमच्या संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे,” स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि प्रेक्षकांच्या प्रेमाने ही मालिका आणखी दीर्घकाळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहील, असा विश्वास आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.