*'गुलाबी'चे टायटल साँग उलगडणार मैत्रीचा रंग*
बहुप्रतीक्षित ‘गुलाबी’ या चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच प्रदर्शित झाले असून गुलाबी शहरातील म्हणजेच जयपूरमधील तीन मैत्रिणींची धमाल यात अनुभवायला मिळत आहे. अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे यांच्यावर चित्रपट करण्यात आलेल्या हा उत्स्फूर्त गाण्याला साई - पियुष यांचे संगीत लाभले असून मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे गाणे हंसिका अय्यर यांनी गायले आहे. मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणाऱ्या तिघींचा प्रवास या गाण्यातून उलगडत आहे.
नुकतेच प्रदर्शित झालेले हे गाणे ऐकायला जितके एनर्जेटिक आहे तितकेच या गाण्याचे सादरीकरणही कमाल आहे. तिघींची बहरत जाणारी मैत्री यात दिसत असतानाच जयपूरचे रंगीबेरंगी सौंदर्यही यात अधिक रंगत आणत आहे. तीन मैत्रिणींच्या जीवनातील अनोख्या प्रवासाची एक झलक या गाण्यातून दिसून येत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, “ गुलाबी चित्रपटाचं टायटल साँग म्हणजेच या तीन स्त्रियांच्या आयुष्यातील आनंद आणि मोकळेपणाचं प्रतीक आहे. या गाण्याच्या माध्यमातून मैत्री, स्वातंत्र्य, आणि स्वप्नं यांचा एक सुसंवाद प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पिंक सिटीमध्ये घडणाऱ्या या कथेत प्रेक्षकांना जीवनातील विविध रंग अनुभवायला मिळतील. हे गाणं प्रत्येकाच्या हृदयाशी जोडलं जाईल.”
व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती आहे.