Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'गुलाबी' शहरात सुरु होणार नव्या मैत्रीचा प्रवास

 'गुलाबी' शहरात सुरु होणार नव्या मैत्रीचा प्रवास 

'गुलाबी'चा धमाल टिझर प्रदर्शित 




नवरात्रीची आठवी माळ म्हणजे अष्टमी. आजचा रंग गुलाबी असल्याने बहुप्रतीक्षित 'गुलाबी' चित्रपटाचा धमाकेदार टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टिझरमध्ये जयपूरच्या गुलाबी नगरीत तिघींच्या नवीन प्रवासाची कहाणी पाहायला मिळत आहे. मैत्री, प्रेम, स्वप्ने, नाती या भावनांच्या विश्वात रंगून जाणाऱ्या स्त्रिया जेव्हा स्वतःच्या विश्वात जगायला सुरुवात करतात आणि स्वतःला उलगडू पाहातात, तेव्हा त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास किती आनंददायी असतो, याचा अनुभव 'गुलाबी' देणार आहे. 



टिझरमध्ये श्रुती मराठे, अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी धमाल करताना दिसत असतानाच यात जयपूर नगरीचे सौंदर्यही दिसत आहे. तीन वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रिया जयपूर शहरात  एकत्र येऊन काय धमालमस्ती करतात, जयपूरमधील तिघींचा हा प्रवास काही वेगळं उलगडू पाहात आहे का, हे पाहाणं औत्सुक्याचे  ठरणार आहे.




व्हॅायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘गुलाबी’ चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर, स्वप्नील भामरे निर्माते आहेत. 'गुलाबी' चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाला साई पियुष यांचे संगीत लाभले आहे. 


चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, ‘’ अष्टमीच्या शुभदिनी आम्ही या स्त्रीप्रधान चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहोत. चित्रपट स्त्रिप्रधान असला तरी हा आजच्या स्त्रीचा आहे.  नाती, विचार, अस्तित्व, स्वप्नं या सगळ्यांचा गुलाबी प्रवास यातून उलगडणार आहे. कधी हसवणारा तर कधी भावनिक करणारा हा चित्रपट प्रत्येक पुरूषाने आपल्या आई, बहिण, बायको, मुलगी आणि मैत्रीणीसोबत अवश्य पाहावा.’’

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.