*"धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज" चित्रपटाचा रोमांचकारी टिझर प्रेक्षकांच्या भेटीला*
*-* प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेता ठाकूर अनुप सिंह साकारणार शंभूराजे
*- मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये २२ नोव्हेंबरला संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार चित्रपटाचा पहिला भाग*
उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज" या दोन भागात प्रदर्शित होणाऱ्या भव्य आणि बिग बजेट चित्रपटाच्या पहिल्या भागाचा रोमांचकारी टिझर मराठी आणि हिंदी भाषेत आज प्रसिद्ध करण्यात आला. सागराचे सुलतानही करती मृत्यूचा रे धावा, सह्याद्रीच्या कड्यावर उभा मराठ्यांचा छावा... अशी टॅगलाईन असलेला टिझर अतिशय ऍक्शनपॅक्ड असून त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे रौद्र रूप दर्शविण्यात आलेले आहे. "जेव्हा सिद्दीला देऊ मात, तेव्हा सांगू मराठ्याची जात" असा दमदार संवाद आणि युद्धाची दाहकता वाढवणारं पार्श्वसंगीत यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा लढाऊ बाणा टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. आजपर्यंत ऐतिहासिक चित्रपटांमध्ये आपण अनेक मैदानी युद्धे बघितली आहेत पण या टीझरमुळे "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज" चित्रपटात मैदानी युद्धासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने त्यांनी उभारलेल्या आरमाराचे समुद्रातील युद्ध भव्य स्वरूपात पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे.
"धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज" चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ठाकूर अनुप सिंग छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार असून छत्रपती संभाजी महाराजांच्या अर्धांगिनी 'महाराणी येसूबाई भोसले' यांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहे. नवरात्री निमित्त रोज प्रसिद्ध होणाऱ्या पोस्टरमुळे किशोरी शहाणे "राजमाता जिजाऊ", भार्गवी चिरमुले "धाराऊ माता", पल्लवी वैद्य "सईबाई भोसले", कृतिका तुळसकर "महाराणी सोयराबाई" या प्रमुख भूमिकेत असून श्रद्धा शिंदे "सरस्वती", तृप्ती राणे "लक्ष्मी", शीतल पाटील "दुर्गा" यांची साथ त्यांना लाभणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता याव्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित आणि संदीप रघुनाथराव मोहितेपाटील प्रस्तुत "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज" चित्रपटाचे निर्माते शेखर रघुनाथराव मोहितेपाटील, सौजन्य सूर्यकांतजी निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा आणि केतनराजे निलेशराव भोसले आहेत तर तुषार विजयराव शेलार यांनी दिग्दर्शन केले आहे तसेच कथा आणि पटकथा संदीप रघुनाथराव मोहितेपाटील आणि डॉ. सुधीर निकम यांनी लिहिली आहे. "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज" हा चित्रपट दोन भागात मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून यातील पहिला भाग २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
*"धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज - भाग १" चा मराठी भाषेतील टिझर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*
https://www.youtube.com/watch?v=kDeWDGTnRNc
*हिंदी भाषेतील टिझर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*
https://www.youtube.com/watch?v=JEXqHK8piNQ