*निक शिंदे आणि सुहानी पगारेचं 'नथनी पाहिजे' गाणं ट्रेंडिंगवर*
*'नथनी पाहिजे' हे रोमँटिक गाणं तरुणाईला थिरकायला पाडतंय भाग*
*नाकातील नथीची रोमँटिक अन् आगळीवेगळी कथा घेऊन निक शिंदे आणि सुहानी पगारे झालेत सज्ज*
महाराष्ट्रात दागिन्यांमध्ये नाकातील नथीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाकातील नथ ही सौंदर्याला चार चाँद लावते. एका स्त्रीच्या सौंदर्यात नथ ही महत्त्वपूर्ण ठरते. हल्ली नथीचा नखरा असा फॅडही आलेला पाहायला मिळाला. आता या नथीच्या नखऱ्यात भर घालत एका रोमॅंटिक गाण्याने प्रवेश केला आहे. 'नथनी पाहिजे' हे गाणं सध्या ट्रेंडिंगवर असलेलं पाहायला मिळतंय. सध्या अनेक आशयघन गाणी रसिकांच्या भेटीस येत आहेत यांत भर घालत 'नथनी पाहिजे' हे गाणं ठेका धरायला लावतंय. या रोमँटिक गाण्याने साऱ्या तरुणाईला भुरळ घातली आहे.
आपल्या स्वप्नातील राजकुमार जेव्हा प्रत्यक्षात आपल्यासमोर काही वेळासाठी येतो तेव्हा त्या प्रेमिकेने राजकुमाराकडे नथ आणि साथ या दोन गोष्टींची मागणी केली, आता ही नथ त्या प्रेमिकेला मिळणार का?, ती प्रेमिका राजकुमाराचं लक्ष वेधेल का, याचं सुंदर असं वर्णन या रोमँटिक गाण्यातून केलेलं पाहायला मिळत आहे. 'ड्रीमर्स स्टुडिओ' अंतर्गत, 'इंद्राक्षी म्युझिक' प्रस्तुत आणि निर्माती बसंती पगारे निर्मित असलेलं हे गाणं संगीत दिग्दर्शक सर्वेश साबळे आणि रुपेश शिरोडे यांनी संगीत दिग्दर्शित केलं आहे. तर या रोमँटिक गाण्यात निक शिंदे आणि सुहानी पगारे यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक रोहित जाधव याने गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे.
सर्वेश-रुपेश म्युझिकल या गाण्याला सोनाली सोनावणे आणि केवल वलंज यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. या गाण्याची कन्सेप्ट रोहित जाधव याची आहे. एकूणच या रोमँटिक गाण्यात निक व सुहानीचा अनोखा अंदाज पाहायला मिळतोय. आता सुहानीला नथचं का हवी आहे याचं गुपित नेमकं काय आहे हे पाहण्यासाठी हे गाणं 'इंद्राक्षी म्युझिक' या युट्युब चॅनेलवर जाऊन नक्की पाहा.