*'रीड लातूर' उपक्रम राबवण्यासाठी जिल्हाभरातून मागणी*
September 25, 2024
0
*'रीड लातूर' उपक्रम राबवण्यासाठी जिल्हाभरातून मागणी*
*आ.धिरज विलासराव देशमुख व दीपिशीखा धिरज देशमुख यांनी वाचन चळवळ निर्माण करून दिली सर्वाना प्रेरणा*
*जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांचे गौरवउदगार*
वाचन संस्कृती जोपासली जावी व त्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'रीड लातूर' उपक्रमाच्या माध्यमातून खूप चांगला सकारात्मक बदल समाजामध्ये दिसून येत असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील अवांतर वाचनाची पुस्तके नियमितपणे वाचत असल्याने त्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता रीड लातूर उपक्रमाची मागणी लातूर जिल्ह्यातील विविध शाळांमधून होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणात रुजला जावा यासाठी जे काही सहकार्य आवश्यक असेल ते निश्चितपणे आपण करू अशी ग्वाही देऊन, आ.धिरज विलासराव देशमुख व दीपशिखा धिरज देशमुख यांनी पुस्तक वाचना विषयी जी चळवळ सुरू केली आहे ती सर्वांना प्रेरणा देणारी असल्याचे गौरवउदगार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनमोल सागर यांनी काढले.
वाचनसंस्कृतीस चालना देत असताना रीड लातूर उपक्रमात सहभागी होवून वाचन चळवळीला आकार देत असलेल्या शिक्षक व शाळांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार श्री धिरज विलासराव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर,रीड लातूरच्या संस्थापीका सौ.दीपशिखा धिरज देशमुख लातूरच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, श्री शंकर सदाकाळे सर, लातूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी निवृत्ती जाधव, औसा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी गोविंद राठोड आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री अनमोल सागर म्हणाले की, ग्रामीण भागात वाचन संस्कृती रजवणे एवढी सोपी बाब नाही. ग्रामीण भागातील मुलांसाठी रीड लातूर उपक्रम हितकारक ठरत असल्याचे सांगून आ. धिरज देशमुख,सौ.दीपशिखा देशमुख व रीड लातूर टीमला भविष्यातील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
*विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक मंडळी करत असलेले कार्य कोतूकास्पद*- *आ.धिरज विलासराव देशमुख*
सत्कार सोहळ्यात आमदार धिरज विलासराव देशमुख आपल्या मनोगत म्हणाले की, ग्रामीण भागातील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आधी 2G, नंतर 3G ,4G, 5G... भविष्यात 6G,7G सुद्धा येतील; पण एका G ला पर्याय नाही, ते म्हणजे
'गुरु G' एवढे महत्त्व शिक्षकांचे असून यातून एक स्पष्ट होते की,शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी कायम ठेवत अनेक वेगवेगळे उपक्रम शाळेत राबवले आहेत.
आपला विद्यार्थी जिवनातील कोणत्याही स्पर्धेत मागे न राहता जीवनातील प्रत्येक स्पर्धेस तो यशस्वीपणे सामोरे जावा यासाठी जे काही चांगले करता येईल त्याचा स्वीकार शिक्षकांनी नेहमीच केला आहे. त्याच विचाराने रीड लातूर हा उपक्रम शिक्षकांनी आपला उपक्रम मानून हाती घेतला म्हणूनच यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.वाचनामुळे आपल्या विचारांमध्ये खूप चांगला बदल घडत असतो,वाचनामुळे जगाचे ज्ञान आपणास मिळते व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मदत होते. हे अनेकांनी पहिले व अनुभवले आहे. मराठी, इंग्रजी व हिंदी पुस्तकांच्या वाचनातून शब्दसाठा समृद्ध होऊन विचाराला ऊंची प्राप्त होते. म्हणूनच मुलगा वंश व मुलगी दिवियाना यांना आपण आवर्जून पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन देत असतो असे आमदार धिरज विलासराव देशमुख आपल्या मनोगत म्हणाले.
*कर्तव्य भावनेतून सुरू असलेला उपक्रम-वंदना फुटाणे.*
समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून सुरू असलेला रीड लातूर हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा ठरत असून या उपक्रमास नेहमीच आपले सहकार्य राहील असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
*वाचन संस्कृती जोपासून एक चांगली पिढी घडवूयात- सौ.दीपशिखा धिरज देशमुख*
समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखून पुढच्या पिढीसाठी काय चांगले करता येईल या विचारातून कार्य करायला हवे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खुप आत्मविश्वास व वाचना विषयी आवड आहे. ही बाब ओळखून रीड लातूरने जिल्हा परिषद शाळांना पुस्तके पुरवली आहेत. या पुस्तकांचा खुप चांगल्या प्रकारे विद्यार्थी वापर करत असून यासाठी शिक्षक मंडळी मोलाचे सहकार्य करत आहेत. शिक्षकां शिवाय रीड लातूर हा उपक्रम रूजला जावू शकत नव्हता असे सांगून सर्व शिक्षकांचे मोलाच्या सहकार्याबद्दल सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांनी आभार मानले.
या कार्यक्रमात रीड लातूरच्या वतीने पहिला जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ञ श्री शंकर सदाकाळे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच राज्य शासन पुरस्कार प्राप्त शिक्षक,शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी शाळा, रीड लातूर उपक्रमात सहभागी होऊन उत्कृष्ट कार्य करत असलेली शाळा व शिक्षकांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नागेश पाटील यांनी केले तर आभार सुरेश सुडे यांनी व्यक्त केले