स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतल्या गायत्री प्रभूच्या लूकला प्रेक्षकांची मिळतेय पसंती
मालिका आणि प्रेक्षकवर्ग यांचं जिव्हाळ्याचं नातं असतं. मालिकेतली पात्र नकळतपणे आपल्या कुटुंबाचा भाग होऊन जातात. मालिकेची गोष्ट, ही गोष्ट पडद्यावर रंगवणारे कलाकार यासोबतच कलाकारांचे हटके लूक हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतल्या गायत्री प्रभूच्या लूकलाही प्रेक्षकांची पसंती मिळतेय. गायत्री प्रभू... अतिशय हुशार आणि स्वावलंबी आहे. फिनिशिंग कॉलेजची टॉपर आणि सध्या एका मोठ्या तारांकित हॉटेलमध्ये मॅनेजरचं काम सांभाळतेय. वर्किंग वुमन असल्यामुळे मानसीचा लूक डिझाईन करताना फॉर्मल लूकवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
अभिनेत्री, नृत्यांगना आणि वेशभुषाकार अशी बहुरंगी ओळख असलेल्या शाल्मली टोळ्येने गायत्रीचा लूक डिझाईन केला आहे. कॉटनच्या साड्या, ट्रेंडिंग ब्लाऊज आणि ऑक्सिडाईज ज्वेलरी असा परफेक्ट फॉर्मल लूक करण्याचं शाल्मलीने ठरवलं. गायत्रीच्या सौंदर्याने हा लूक आणखीनच खुलून आलाय.
गायत्री प्रभूची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी कुलकर्णी तब्बल १० वर्षांनंतर मालिका विश्वात पदार्पण करतेय. गायत्रीच्या भूमिकेला आणि तिच्या लूकला मिळणाऱ्या भरभरुन प्रतिसादाविषयी सांगताना मानसी म्हणाली, ‘मला साडी नेसायला खूप आवडतं. गायत्रीच्या लूकसाठी डिझाईन केलेल्या साड्या फारच सुरेख आहेत. प्रेक्षकांकडून या लूकचं खूप कौतुक होतंय. मला स्वत:ला हा लूक खूप आवडलाय. गायत्रीचा लूक परिधान केल्यावर एक वेगळाच आत्मविश्वास जाणवतो. तेव्हा पाहायला विसरु नका थोडं तुझं आणि थोडं माझं रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’