*मनोरंजन क्षेत्रातील पत्रकारांसोबत सांस्कृतिक मंत्र्यांनी साधला संवाद*
*ही बैठक ऐतिहासिक, सांस्कृतिक विकासासाठी पोषक -शीतल करदेकर*
मुंबई -
मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शीतलताई करदेकर यांच्या नेतृत्वात तसेच मुंबई संघटन सचिव सचिन चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री अतिथीगृहात सांस्कृतिक क्षेत्रातील माध्यमकर्मीयांची महत्त्वाची बैठक भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडी तर्फे आयोजित केली होती. या बैठकीत मंदार जोशी ( तारांगण), सौम्या बाजपेयी (हिंदुस्तान टाइम्स ) राजेश शिरभाते ( गावकरी) संतोष भिंगार्डे ( सकाळ) श्रेयस सावंत (पुढारी ) माईचे मुंबई सहसंघटन सचिव चेतन काशीकर( न्यूज नेशन) निलेश अडसूळ (लोकमत फिल्मी ) सुरज खरटमल ( रत्न मराठी) चित्राली चौगुले ( इट्स मज्जा) आदी माध्यमकर्मी उपस्थित होते.
मनोरंजन क्षेत्रातील विविध घडामोडी तसेच भविष्यात मनोरंजन क्षेत्राचा होणारा विकास याबरोबरच पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्याचे महत्त्वाचे काही प्रश्न यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर सांस्कृतिक मंत्र्यांनी त्यांच्या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले.
या बैठकीला भाजपा कामगार मोर्चाचे अध्यक्ष विजय हरगुडे, भाजपा चित्रपट आघाडीचे अध्यक्ष समीर दीक्षित, चित्रपट आघाडीचे सरचिटणीस राकेश ठाकूर तसेच हेनल मेहता ही मंडळी उपस्थित होती.
सरकारच्या विविध सांस्कृतिक आणि अनुदान समितीमध्ये या क्षेत्रातील कमीत कमी दोन पत्रकारांचा समावेश करण्यात यावा, बरेचसे पत्रकार मुंबईबाहेर राहात आहेत. त्यांना मुंबईत सरकारी कोट्यातून घर किंवा एखादा भूखंड उपलब्ध करून देण्यात यावा, राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सरकारतर्फे आमंत्रण, मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी विशेष पुरस्काराचे नियोजन करून या अभ्यासकांना गौरविण्यात यावे, महत्त्वाचे म्हणजे सांस्कृतिक धोरणात या क्षेत्रातील पत्रकारांसाठी विशेष आर्थिक व सुविधांसाठी नियोजन असायला हवे आदी मागण्यांचे एक निवेदन मंत्री महोदयांना देण्यात आले. हे सगळे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी दिले.
समीर दीक्षित म्हणाले की गेल्या दहा वर्षापासून सिने पत्रकार आणि माध्यम रंगकर्मी यांची बैठक झालेली नव्हती आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी या प्रश्नांची व्यक्तिगत नोंद घेऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
शीतल करदेकर यांनी सांगितले की,सरकारच्या सांस्कृतिक धोरणात या क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या माध्यमकर्मींसाठी कोणतेही स्थान नसते ,ते असणे आवश्यक आहे,सांस्कृतिक कार्य मंत्र्यांसोबत १ऑगस्ट ला झालेली ही बैठक ऐतिहासिक आहे आणि तिचे परिणाम पडसाद मनोरंजन क्षेत्राच्याही हिताचे ठरतील.
या बैठकीचे नियोजन करणाऱ्या भाजप कामगार मोर्चा व चित्रपट आघाडीचे यासाठी आम्ही आभारी आहोत .