Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अमृता खानविलकर संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या एका संस्थेच्या सहकार्याने सादर करत आहे “वर्ल्ड ऑफ स्त्री”*

*चित्रपट आणि कला क्षेत्रातील वीस वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या एका संस्थेच्या सहकार्याने सादर करत आहे “वर्ल्ड ऑफ स्त्री”*
अमृतकला स्टुडिओ आणि 'अर्थ' एनजीओ प्रस्तुत 'वर्ल्ड ऑफ स्त्री' हा अनोखा नृत्याविष्कार घेऊन अमृता खानविलकर रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच एखादी अभिनेत्री एका स्वयंसेवी संस्थेसोबत संलग्न होत, नृत्यकलेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे अनोखे रूप सादर करणार आहे. यात शृंगार, भक्ती, शक्ती आणि स्त्री तत्त्व यांचा समावेश आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने अमृता खानविलकरने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. ती एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तिचा नृत्याविष्कार रसिकांनी अनेकदा पाहिला आहे. असाच एक अनोखा नृत्य नजराणा अमृता खानविलकर 'वर्ल्ड ऑफ स्त्री' च्या माध्यमातून घेऊन येत आहे. या निमित्ताने तिचे थेट प्रेक्षकांसमोर नृत्यप्रयोग सादर करण्याचे स्वप्न साकार होत आहे. या नृत्यप्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांना क्लासिकल, सेमी क्लासिकल म्युझिक आणि नृत्याची अनोखी मैफल अनुभवयाला मिळणार आहे. या कलाकृतीत स्त्रीशक्ती, महिला सक्षमीकरण, शृंगार, भक्ती यांचे दर्शन घडणार आहे. यात तिच्यासोबत नृत्यदिग्दर्शक कुशल नर्तक आशिष पाटील देखील सहभागी होणार आहेत. या नृत्याविष्काराची मैफल ९० मिनिटांची असून पुढील येणाऱ्या काळात विविध नाट्यगृहात हा प्रयोग होणार आहे. येत्या २४ ऑगस्टला 'वर्ल्ड ऑफ स्त्री' चा पहिला प्रयोग टाटा थिएटर, एनसीपीएमध्ये सादर होणार आहे. अमृता खानविलकर एक अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहेच पण तिच्या नृत्याविष्काराची एक विशिष्ट बाजू प्रेक्षकांना या निमित्ताने जवळून अनुभवायला मिळणार आहे.
'वर्ल्ड ऑफ स्त्री' या नृत्याविष्काराबद्दल अमृता खानविलकर सांगते, "नृत्यकला हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. 'वर्ल्ड ऑफ स्त्री' च्या आविष्कारामुळे नृत्य, संगीत, नाट्य या तिन्ही कलांची सांगड घालून एक अनोखी कलाकृती रसिकांसमोर येतेय, याचा मला अत्याधिक आनंद होतोय. नृत्य हे भावना व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे मला यातून व्यक्त व्हायला नेहमीच आवडते. त्यामुळे अशा या भावपूर्ण मैफलीत रसिकांचे मनोरंजन करण्यात मला कुशल नर्तक आशिष पाटील यांची साथ लाभणार आहे. माझ्या जीवनातील एक स्वप्न साकार होणार असून प्रेक्षकांना हा आमचा नवीन प्रयोग नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे. हा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ५ (SDG 5-Gender Equality) शी सुसंगत असून स्त्री सक्षमीकरण, स्त्री शक्ती मूल्यांना प्रतिबिंबित करणारा असून सदर प्रयोग प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यास उत्सुक आहे. माझ्या कलेचा वापर करून समाजात जागरूकता निर्माण करण्याचे माझे स्वप्न होते आणि ते ‘earth’ या संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या संस्थेच्या सहकार्याने पूर्ण होत आहे, याचा मला अत्यानंद होत आहे.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.