'गुलमोहर'ने कोरले 70 व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपट (हिंदी) पुरस्कारावर नाव!
August 17, 2024
0
**हृदयस्पर्शी कौटुंबिक मनोरंजनपट 'गुलमोहर'ने कोरले 70 व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपट (हिंदी) पुरस्कारावर नाव!*
स्टार स्टुडिओ प्रस्तुत ' गुलमोहर ' या पुरस्कार विजेत्या हृदयस्पर्शी कौटुंबिक मनोरंजनपटाने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली असून देशातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपट (हिंदी), सर्वोत्कृष्ट संवाद आणि मनोज वाजपेयी यांच्या अभिनयासाठी विशेष उल्लेख पुरस्कार पटकावला आहे.
' गुलमोहर ' चित्रपटामध्ये सुमारे एक दशकानंतर चित्रपटसृष्टीत परतलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री पद्मभूषण आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शर्मिला टागोर, राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यासह सिमरन, सूरज शर्मा आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते अमोल पालेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. राहुल व्ही. चित्तेला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचा प्रीमियर शो पाहिल्यानंतर समीक्षक आणि चाहत्यांनी गुलमोहरचे सारख्याच भावनेने कौतुक केले. "उत्साह वाढवणारा चित्रपट", "हृदयाला स्पर्श करणारा चित्रपट", "पोएट्री इन मोशन", "भावनिकदृष्ट्या समृद्ध करणारा चित्रपट", "भव्य!" अशा प्रतिक्रिया सर्वांनीच दिल्या.
डिस्ने स्टार स्टुडिओचे प्रमुख विक्रम दुग्गल या ऐतिहासिक पुरस्कार विजयानंतर म्हणाले की, " गुलमोहरने सर्वोत्कृष्ट चित्रपट (हिंदी), सर्वोत्कृष्ट संवाद आणि अभिनयासाठी मनोज वाजपेयी यांचा विशेष उल्लेख यासाठी प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला याचा आम्हाला आनंद झाला आहे. आजच्या डिजिटल युगात कुटुंबाला एकत्र करणाऱ्या कथा तयार करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे आपल्या हृदयस्पर्शी कथेने गुलमोहरने हे साध्य केले आहे. आपल्या दिग्दर्शकीय वाटचालीतील पहिल्याच चित्रपटात राहुल व्ही. चिट्टेला यांनी हे काम केले याबद्दल धन्यवाद. ही कथा जगासमोर आणण्यासाठी आम्ही भारतातील उत्कृष्ट प्रतिभेला सहकार्य केले याचा आम्हाला अभिमान वाटतो."
चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल व्ही. चीत्तेला म्हणाले की, " गुलमोहर या आमच्या लाडक्या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे मी सन्मानित झालो आहे. मनोज वाजपेयी यांनी आपल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता - विशेष उल्लेख पुरस्कार जिंकल्याचा मला आनंद झाला आहे. मनोज वाजपेयी आणि शर्मिला टागोर यांच्याबरोबर चित्रपट करणे एक दुर्मिळ अनुभव होता. शेवटी मी माझ्या निर्मिती आणि लेखन सहकारी अर्पिता मुखर्जी यांना धन्यवाद देतो. मी स्टार स्टुडिओला धन्यवाद देतो ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. आम्ही सध्याच्या काळात कुटुंब आणि घर म्हणजे काय हे दाखवले आणि त्या प्रक्रियेचा भाग झालो."
गुलमोहर हा चित्रपट चॉकबोर्ड एंटरटेनमेंट आणि ऑटोनॉमस वर्क्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार स्टुडिओने निर्माण केला आहे. चित्रपटाचे मूळ संगीत सिद्धार्थ खोसला (धीस इज अस) यांनी दिले आहे.
राहुल व्ही. चित्तेला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून राहुल व्ही. चित्तेला आणि अर्पिता मुखर्जी यांनी गुलमोहर चित्रपटाचे कथा - पटकथा लेखन केले आहे. गुलमोहर चित्रपट सध्या डिस्ने+ हॉटस्टारवर प्रसारित होत आहे.