*आनंदी वास्तू प्रोडक्शनचे ‘स्वामी शक्ती’ भक्तीगीत भेटीला*
July 23, 2024
0
*आनंदी वास्तू प्रोडक्शनचे ‘स्वामी शक्ती’ भक्तीगीत भेटीला*
आनंदी वास्तू प्रोडक्शनच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी शक्ती हे भक्तीगीत आनंद पिंपळकर यांच्या ‘आनंदी वास्तू’ या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले आहे. एखाद्या शॉर्टफिल्म प्रमाणे गीताचे चित्रण करण्याची परंपरा व पद्धत आनंदी वास्तू प्रोडक्शनने केली असून गाण्याच्या माध्यमातून कथा सादरीकरण, गीतातून चित्रपटाची भव्यता दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
स्वामी शक्ती हे गीत स्वामी भक्तांना ही पर्वणी असून योगेश तपस्वी यांच्या आवाजातील, हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या या गाण्याला तेजस सालोखे यांनी संगीत दिले आहे. याचे चित्रीकरण नुकतेच पुणे येथे झाले. स्वामी शक्ती या भक्तिमय गाण्यांमध्ये सामाजिक संदेश देण्यात आला आहे. अन्यायग्रस्त मुलीला न्याय मिळवून देण्याचे काम करणाऱ्या ६५ वर्षीय जोशी काका व जोशी काकूंची ही कथा आहे. पांढरपेशा पापभिरू रिटायर्ड साधा माणूस जीवनात ठरवलं तर काय करू शकतो. समाज बदलण्याची ताकदही ठेवू शकतो. सामान्य माणसाची असामान्य ताकद काय आहे हे या गीतामधून आपल्याला पहायला मिळते. कर्तुत्वाला, नेतृत्वाला आणि दातृत्वाला जर श्री गुरूची साथ असेल तर कोणतेही शिवधनुष्य तो लीलया पेलू शकतो असा संदेश या गीतामधून देण्यात आलेला आहे.
प्रमुख भूमिकेमध्ये प्राजक्ता गायकवाड, रमेश परदेशी आणि आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर, गीतांजली टेमगिरे, आर जे बंड्या असून भव्यदिव्य स्वरूपात याचे सादरीकरण करण्यात आले आहे.
श्री योगेश तपस्वी यांचा आवाज हृदयापर्यंत पोहोचतो व गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सद्गुरूंना केलेली ही अद्भुत वंदना पाहिल्यानंतर आपले ही अंतकरण भक्तीने फुलून येईल. सर्व सद्गुरु भक्तांसाठी ही पर्वणी असून श्री आनंद पिंपळकर व सर्वच कलाकार मंडळींनी आपल्या व्यक्तिरेखा समर्थपणे सांभाळल्या आहेत. ओमकार माने यांनी दिग्दर्शन केले असून अश्विनी पिंपळकर व प्रणव पिंपळकर निर्माते आहेत.