Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ मध्ये सिद्धार्थ चांदेकर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ मध्ये सिद्धार्थ चांदेकर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कार्यक्रमात पाहायला मिळणार सिद्धार्थचे सिद्धांत
मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचं तिसरं पर्व १३ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. पहिल्या पर्वातही सिद्धार्थने सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती. तिसऱ्या पर्वात पुन्हा एकदा ही जबाबदारी नव्याने पेलण्यासाठी सिद्धार्थ सज्ज आहे. सिद्धार्थचा हजरजबाबीपणा सर्वांनाच परिचित आहे. यंदाच्या पर्वात सिद्धार्थचा सिद्धांतही पाहायला मिळेल.
जगातला असा कोणताच प्रॉब्लेम नाही ज्यावर सिद्धार्थचा सिद्धांत तोडगा देऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा स्पर्धकांना स्पर्धेत काय करायचं? पुढे कसं जायचं? असे प्रश्न सतावतील तेव्हा सिद्धार्थचे सिद्धांत मदतीला धावतील. सिद्धार्थचे सिद्धांतं फक्त स्पर्धकांची अडचण सोडवण्यासाठीच नाही तर प्रेक्षकांना सुद्धा जीवनभराचं ज्ञान देऊन जातील. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी तुम्ही या सिद्धांतांचा वापर करून तुमचं जगणं सोपं आणि समृद्ध करू शकता. त्यामुळे मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या या तिसऱ्या पर्वात काय मिळणार? या प्रश्नावर सिद्धार्थचा सिद्धांत सांगतो...सुरेल गाणी, परीक्षकांची टिपण्णी, यासोबतच ऐकायला मिळणार सिद्धार्थची सिद्धांत वाणी. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद हा कार्यक्रम सिद्धार्थसाठी खुपच खास आहे. या कार्यक्रमाविषयी सांगताना सिद्धार्थ म्हणाला, ‘पहिलं पर्व जेव्हा मी केलं तेव्हा सगळ्या छोटया उस्तादांच्या आणि परिक्षकांच्या मी प्रेमात पडलो. परिक्षक ज्याप्रकारे काळजीने त्या लहान मुलांशी बोलतात, चांगल्या गोष्टी समजावून सांगतात तेव्हा खरंच असं वाटतं की हे फक्त टीव्ही शोजचे जज नाही तर खरच गुरु आहेत.
ज्यांचा अनुभव आणि ज्ञान खूप मोलाचं आहे. कार्यक्रमात कुठेही औपचारिकता नाही. आमचं छान कुटुंब तयार झालं आहे. या मंचावर संपूर्णपणे मराठी गाणी ऐकायला मिळतात. स्पर्धक मंचावर अशी गाणी सादर करतात जी त्यांच्या जन्माच्या कित्येक वर्ष आधी आली असतील. तरीसुद्धा त्यांच्या तोंडपाठ आहेत. ही जुनी नवी सगळी गाणी या लहान मुलांकडून जर का नव्या पीढीपर्यंत पोहोचणार असतील तर याहून चांगली गोष्ट नाही. सूत्रसंचालक म्हणून माझं काम हेच आहे की सगळ्या छोट्या उस्तादांचा मोठा भाऊ व्हायचं. सोबतीला माझे सिद्धांत पण असतीलच. जेव्हा जेव्हा टेन्शनचं वातवरण असेल तेव्हा माझे सिद्धांत येतील आणि माहोल हलकाफुलका करतील. गाण्यासोबतच खूप सारी धमाल या कार्यक्रमात अनुभवायला मिळणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व तिसरे १३ जूलैपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.