*स्टार प्लस’वर ८ ऑगस्ट पासून झळकणार नवी मालिका ‘ॲडव्होकेट अंजली अवस्थी’!* ‘स्टार
July 26, 2024
0
‘ *स्टार प्लस’वर ८ ऑगस्ट पासून झळकणार नवी मालिका ‘ॲडव्होकेट अंजली अवस्थी’!*
‘स्टार प्लस’ने आपल्या ‘ॲडव्होकेट अंजली अवस्थी’ या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. या नव्या मालिकेत श्रीतमा मित्रा आणि अंकित रायझादा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेचा पहिला वेधक प्रोमो निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे. तर मग, अंजली अवस्थी हिचा आकांक्षांना गवसणी घालण्याचा प्रवास आणि तिची अन्यायाविरूद्धची लढाई पाहण्यासाठी सज्ज व्हा.
‘स्टार प्लस’ वाहिनी आपल्या प्रेक्षकांकरता वेधक आणि स्वारस्यपूर्ण विषयांवरील मनोरंजनपर मालिका सादर करण्याकरता ओळखली जाते. नात्यांची गुंतागुंत अलवारपणे उलगडणाऱ्या या मालिका प्रेक्षकांच्या भावभावनांना साद घालतात. ‘स्टार प्लस’ वाहिनीवर एकाहून एक सरस मालिका आहेत, ज्यांचा उद्देश केवळ प्रेक्षकांचे रंजन करणे इतकाच नाही, तर त्यांचे सबलीकरण करणे हाही आहे. या मालिकांमध्ये अनुपमा, गुम है किसीके प्यार में, यह रिश्ता क्या कहलाता है, उडने की आशा, माटी से बंधी डोर, झनक, दिल को तुमसे प्यार हुआ आणि ये है चाहतें या मालिकांचा समावेश आहे, ज्या कौटुंबिक नाट्य व प्रेमकथा यांवर बेतलेल्या आहेत आणि या मालिकांना प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
‘स्टार प्लस’ वाहिनीने आजवर स्पर्श न केलेल्या आणखी एका विषयाला हात घातला आहे आणि श्रीतमा मित्रा (ॲडव्होकेट अंजली अवस्थी) आणि अंकित रायझादा (अमन सिंग राजपूत) यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ॲडव्होकेट अंजली अवस्थी’ ही नवी मालिका ‘स्टार प्लस’ पेश करीत आहेत. ‘ब्लूज प्रॉडक्शन्स’ने या मालिकेची निर्मिती केली आहे.
‘ॲडव्होकेट अंजली अवस्थी’ या मालिकेची घोषणा करताना, निर्मात्यांनी या मालिकेचा पहिलावहिला वेधक प्रोमो प्रदर्शित केला आहे. दिल्लीत घडणारी ही कथा आहे. या प्रोमोत वकील अंजली अवस्थी हिच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे, अंजलीला कायद्याच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याची इच्छा आहे, परंतु तिला तिथपर्यंत पोहोचण्याकरता असंख्य आव्हाने आणि अडथळे पार करावे लागतात. या प्रोमोत अंजलीच्या व्यक्तिमत्वातील धाडसी पैलू आणि तिच्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी तिने घेतलेली अन्यायाविरोधातील ठोस भूमिकाही दाखवण्यात आली आहे. ॲड. अंजली अवस्थी हे एक कणखर आणि निर्भय पात्र आहे; अलौकिक बुद्धिमत्तेकरता आपण ओळखले जावे, असे तिला वाटते. पददलितांना न्याय हा तिचा मूळ उद्देश आपण जाणून घ्यायला हवा, असे तिच्या वाचकांना नक्कीच वाटेल.
बदनाम झालेल्या तिच्या वडिलांची प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करण्याच्या प्रयत्नांत, संघर्ष करणारी ॲडव्होकेट अंजली अवस्थी ही कायदा क्षेत्रातील एक प्रतिभावंत व्यक्ती बनली आहे, ती केवळ तिच्या पहिल्यावहिल्या प्रकरणातच एका अत्यंत भ्रष्ट आणि प्रभावशाली वकिलाला शिंगावर घेण्यासाठी! ॲड. अंजली अवस्थीचा कायद्याच्या क्षेत्रात पारंगत कशी होते आणि तिच्या कुटुंबाचा सन्मान पुन्हा प्रस्थापित करण्याचा मार्ग कसा प्राप्त करते हे पाहणे रंजक असेल.
‘ब्लूज प्रॉडक्शन्स’ निर्मित, ‘ॲडव्होकेट अंजली अवस्थी’ ही मालिका ८ ऑगस्टपासून ‘स्टार प्लस’ वाहिनीवर रात्री ८.३० वाजता प्रसारित होईल.