Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*सुप्रसिद्ध गायिकेचा थक्क करणारा जीवनप्रवास 'मंगला' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर*

*सुप्रसिद्ध गायिकेचा थक्क करणारा जीवनप्रवास 'मंगला' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर* *'मंगला' चित्रपटाचे मोशन पोस्टर समोर, भूमिकेत नेमकं कोण याची उत्सुकता* *'मंगला' चित्रपटातून उलगडणार एका महान गायिकेच्या आयुष्याचे विविधांगी पदर* *गायिकेवर झालेल्या ऍसिड अटॅकची अनसुनी कहाणी 'मंगला' या चित्रपटातून करणार थक्क* सध्या सर्वत्र महिलांवर आधारित अनेक कथानक असलेले चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येताना पाहायला मिळत आहेत. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटांना समस्त महिलावर्ग भरभरुन प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. महिला केंद्रित चित्रपटांच्या यादीत आता आणखी एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. या चित्रपटाचे कथानक हा एका गायिकेचा प्रवास मांडणारा आहे. 'मंगला' असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या नव्या चित्रपटाचं मोशन पोस्टर समोर आलं आहे. मंगला या गायिकेच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडदयावर येणार आहे. मंगलावर झालेला ऍसिड अटॅक आणि त्या कठीण परिस्थितीशी तिने दिलेली झुंज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तसेच या ऍसिड अटॅक संबंधित कोणताही कायदा त्याकाळी नसल्याने योग्य तो न्याय न मिळाल्याने या लढ्याचा सामना मंगलाने कसा केला अशी खरीखुरी कथा पाहणं रंजक ठरणार आहे.
'रैश प्रोडक्शन प्रा.लि' आणि 'फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'मंगला' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. मोशन पोस्टरवर पाठमोरी बसलेली महिला नेमकी कोण आहे?, ही भूमिका नेमकी कोणती अभिनेत्री साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. एकूणच या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शिका अपर्णा हॉशिंग यांनी त्यांचा अनुभव शेअर करत अस म्हटलं की, "हा चित्रपट महिलाकेंद्रित असून एका ज्ञात व अज्ञात महिलेच्या जीवनप्रवास दर्शिवणारा आहे. मंगला या चित्रपटात दिसणारी, गायनकलेची आवड असणारी ही महिला नेमकी कोण आहे हे लवकरच कळेल. हा चित्रपट आशयघन असून एका महान गायिकेचा प्रवास उलगडणार आहे. चित्रपट करताना खूप काही नव्याने प्रत्येकाला शिकायला मिळालं".

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.