Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'अष्टपदी' चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण..

'अष्टपदी' चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण... घोषणा झाल्यापासून उत्सुकता वाढवणाऱ्या 'अष्टपदी' या आगामी मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण करण्यात आलं आहे. 'अष्टपदी' या अनोख्या शीर्षकामुळे या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळेल याबाबत उत्सुकता वाढते. आशयघन कथानकाला उत्तम सादरीकरणाची किनार जोडत या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं असून, सध्या पोस्ट प्रोडक्शनचं काम वेगात सुरू आहे.
महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या 'अष्टपदी' चित्रपटाचे निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील आहेत. चित्रपट निर्मितीसोबतच उत्कर्ष जैन यांनी दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळली आहे. मुहूर्तानंतर लगेचच 'अष्टपदी'च्या चित्रीकरणाला कोल्हापूर येथे सुरुवात करण्यात आली. ठरलेल्या शूटिंग शेड्यूलनुसार कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात तसेच काही भाग अंबरनाथ येथे या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. कथानकाला अनुसरून असलेल्या पावसाळ्यापूर्वीच्या वातावरणात 'अष्टपदी'चं चित्रीकरण करण्यात आलं. याबाबत दिग्दर्शक उत्कर्ष जैन म्हणाले की, या चित्रपटाची वनलाईन खूप सुरेख आहे. त्यावर लिहिण्यात आलेली पटकथा मुद्देसूद, उत्कंठावर्धक तसेच अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणारी आहे. त्यासाठी निवडण्यात आलेले कलाकार तितक्याच ताकदीचे आहेत. सर्वच कलाकार-तंत्रज्ञांच्या अथक परिश्रमाच्या बळावर ठरलेल्या वेळेत 'अष्टपदी'चं चित्रीकरण पूर्ण करण्यात आल्याचं समाधान आहे. सध्या पोस्ट प्रोडक्शच्या कामावर लक्ष केंद्रित आलं आहे. या चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांसमोर एक परिपूर्ण कौटुंबिक चित्रपट सादर करण्याचा आपल्या टिमचा मानस असल्याचेही उत्कर्ष म्हणाले. कोल्हापूरमधील नयनरम्य लोकेशन्सही या चित्रपटात पाहायला मिळतील. सुरेल गीत-संगीत ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरणार आहे.
'अष्टपदी'ची कथा, पटकथा व संवाद लेखन करण्याचं काम क्रिएटिव्ह दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी केलं आहे. या चित्रपटात संतोष जुवेकर, मयुरी कापडणे, अभिनव पाटेकर, मिलिंद फाटक, मोना कामत, स्वप्नील राजशेखर, माधव अभ्यंकर , विशाल अर्जुन, विनिता काळे, चंदा सारसेकर, कल्पना राणे, विशाल अर्जुन, महेंद्र पाटील, नयना बिडवे आदी कलाकार आहेत. डिओपी धनराज वाघ यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, निलेश रसाळ यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. गीतकार गणेश चेऊलकर आणि प्रशांत जामदार यांनी लिहिलेली गाणी संगीतकार मिलिंद मोरे यांनी संगीतबद्ध केली असून, पार्श्वसंगीतही त्यांनीच दिलं आहे. रंगभूषा अतुल शिधये यांनी केली असून, अंजली खोब्रेकर , स्वप्ना राऊत यांनी वेशभूषा केली आहे. या चित्रपटाचे सहदिग्दर्शक राहुल पाटील आणि नंदू आचरेकर, तर कार्यकारी निर्माते अजय खाडे आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.