Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*पुन्हा घुमणार ‘दुनियादारी’चा आवाज!*

*पुन्हा घुमणार ‘दुनियादारी’चा आवाज!* *'पुन्हा दुनियादारी'च्या निमित्ताने निर्मात्या उषा काकडे यांचे अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासोबत असोसिएशन* काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि संजय जाधव ही जबरदस्त टीम अकरा वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार, अशी बातमी सर्वत्र झळकली होती. तेव्हापासूनच खरंतर सर्वत्र या चित्रपटाविषयी चर्चा रंगली होती. अनेक तर्कवितर्कही काढले जात होते. परंतु आता या सगळ्यावरील पडदा उठला असून अखेर या चित्रपटाचे नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. 'पुन्हा दुनियादारी’ असे या चित्रपटाचे नाव असून ‘दुनियादारी’तील मैत्री प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. 'पुन्हा दुनियादारी'मध्ये सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांची यारी पाहायला मिळणार असली, तरी त्यांची कट्टा गँग ‘पुन्हा दुनियादारी'त त्यांना साथ देणार का, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘पुन्हा दुनियादारी’च्या निमित्ताने निर्मात्या उषा काकडे यांनी अमेय विनोद खोपकर, स्वाती खोपकर आणि निनाद बत्तीन यांच्यासोबत असोसिएशन केले आहे. उषा काकडे यांनी नुकतेच उषा काकडे प्रोडक्शन सुरु केले असून त्या आगामी 'विकी : फुल्ल ऑफ लव्ह' या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. याव्यतिरिक्त त्या व्यावसायिका आणि समाजसेविका म्हणूनही कार्यरत आहेत. एवीके पिक्चर्स, उषा काकडे प्रोडक्शन्स, मैटाडोर प्रोडक्शन, व्हिडीओ पॅलेस निर्मित प्रदर्शित होणाऱ्या 'पुन्हा दुनियादारी' या चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरु होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. अमेय खोपकर, स्वाती खोपकर, उषा काकडे, नानूभाई जयसिंघानी, निनाद बत्तीन निर्माते आहेत.
या चित्रपटाबाबत निर्माते अमेय खोपकर म्हणतात, "२०१३ मध्ये 'दुनियादारी' आल्यानंतर त्याचा गाजावाजा आणि प्रसिद्धी पाहाता 'पुन्हा दुनियादारी' ची उत्सुकता रसिकवर्गाला लागली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही मैत्री प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत. कलाकार, दिग्दर्शक, निनाद बत्तीन आणि संपूर्ण टीमसोबत माझे ऋणानुबंध आहेत. या टीमसोबत काम करताना अतिशय आनंद होतोय. 'पुन्हा दुनियादारी’ आता मैत्रीत आणि प्रेमात काय वळणे येणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.'' निर्मात्या उषा काकडे म्हणतात, '' "दुनियादारी ही माझी सर्वात आवडती फिल्म आहे. या फिल्मचा दुसरा पार्ट येतोय आणि मी या फिल्मची निर्मिती करतेय याचा मला प्रचंड आनंद आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लेखक, दिग्दर्शकांच्या निर्माती म्हणून पाठीशी उभे राहून मराठी चित्रपटसृष्टी अधिक समृद्ध करणे हा माझा मानस आहे. दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, "शिरीन, श्रेयस, दिघ्या या मैत्रीचा संगम परत 'पुन्हा दुनियादारी' च्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ११ वर्षांची आतुरता संपत अखेर 'पुन्हा दुनियादारी’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. विविध प्रोजेक्ट्च्या निमित्ताने या सगळ्यांसोबत काम केले. परंतु पुन्हा एकदा या टीमसोबत एकत्र काम करण्याची मजाच और आहे. हे बॉण्डिंग इतके स्ट्रॉन्ग आहे की, त्याचे पडसाद 'पुन्हा दुनियादारी' मध्ये निश्चितच दिसतील. आता यात आणखी काय ट्विस्ट असणार, हे चित्रपट आल्यावरच कळेल. त्यात आता उषा काकडे यांसारख्या निर्मात्या आमच्या या कुटुंबात सहभागी झाल्या आहेत.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.