Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अभिनेत्री छाया कदम यांचं आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण*

*अभिनेत्री छाया कदम यांचं आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण* *२ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या "बारदोवी" या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेसह सहनिर्मितीची जबाबदारी* दमदार अभिनयासाठी अभिनेत्री छाया कदम यांचं नाव घेतलं जातं. अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. अलीकडेच त्यांची भूमिका असलेला चित्रपट कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. अभिनेत्री म्हणून उत्तम काम करतानाच आता छाया कदम यांच्या कारकिर्दीत नवं वळण आलं आहे. बारदोवी या आगामी चित्रपटाची सहनिर्मिती छाया कदम यांनी केली असून, त्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेतही आहेत. २ ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
बारदोवी या आगामी हिंदी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. सतोरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत बारदोवी या चित्रपटाची निर्मिती कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित माणिक शिवाजी वायकर, संदीप बाबूराव काळे, एल्विन राजा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर छाया कदम सहनिर्मात्या आहेत. तर संतोष बळीराम तांबे, रविराज शिवाजी वायकर, अभिजित सुमन वसंत पाटील, नितीन पाटील सहायक निर्माता आहेत. करण शिवाजीराव चव्हाण यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचे छायाचित्रण विक्रम पाटील यांनी केलेले आहे. तर कार्यकारी निर्माता म्हणून विकास डीगे हे आहेत. छाया कदम यांच्यासह चित्रपटात चित्तरंजन गिरी, विराट मडके यांच्यासारखे कसलेले कलावंत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरवर शाल पांघरून करारी नजरेनं पाहणारी स्त्री दिसते. ही भूमिका छाया कदम यांनी साकारली आहेत. छाया कदम यांची आतापर्यंतची प्रत्येक भूमिका वेगळी आहे आणि सर्वच भूमिकांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. छाया यांची आजवरची कारकिर्द पाहता त्यांनी निर्मितीसाठी आणि अभिनेत्री म्हणून निवडलेला बारदोवी हा चित्रपट त्याच धाटणीचा असल्याचा अंदाज पोस्टर पाहून बांधता येतो. चित्रपटाचं पोस्टर अत्यंत लक्षवेधी आहे. त्यामुळे आता २ ऑगस्टला चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्याची प्रतीक्षा प्रेक्षकांना करावी लागणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.