*'बाबू'च्या २५ फूट भव्य पोस्टरचे अनावरण*
July 11, 2024
0
*'बाबू'च्या २५ फूट भव्य पोस्टरचे अनावरण*
*टायटल सॉन्ग लाँच सोहळा दिमाखात संपन्न*
मयूर शिंदे दिग्दर्शित 'बाबू' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून अंकित मोहन, नेहा महाजन आणि रुचिरा जाधव यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर आणि सॉन्ग लाँच सोहळा पुण्यात दिमाखात पार पडला. यावेळी 'बाबू' म्हणजेच अंकित मोहन याच्या २५ फूट भव्य पोस्टरचे अनावरण करण्यात आले. तर चित्रपटातील टायटल सॉन्गही या दरम्यान लाँच करण्यात आले. या सोहळ्यात अंकित मोहनने जेसीबीवरून जबरदस्त एन्ट्री करत टायटल साँगवर धमाकेदार परफॅार्मन्स सादर केला. ढोल- ताशे, टाळ्या शिट्ट्यांच्या जल्लोषात उपस्थितांनाही त्याला उत्स्फूर्त साथ दिली. या दिमाखदार सोहळ्यात 'बाबू'मधील कलाकारांसह दिग्दर्शक मयूर शिंदे, निर्मात्या सुनीता बाबू भोईरही उपस्थित होत्या.
नुकत्याच झळकलेल्या या पोस्टरमध्ये अंकित मोहनचा डॅशिंग लूक दिसत असून त्याची पिळदार शरीरयष्टी तरूणाईचे लक्ष वेधणारी आहे. तर 'बाबू'मधील प्रदर्शित झालेले एनर्जेटिक टायटल साँगही कमाल आहे. मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला संतोष मुळेकर यांचे संगीत लाभले आहे. बॅालिवूडचे नामवंत गायक नकाश अझीझ यांच्या आवाजाने या गाण्यात अधिकच रंगत आली आहे. गाण्यात अंकित मोहनचा एक वेगळाच स्वॅग दिसत आहे. या भन्नाट गाण्याचे सादरीकरण, नृत्यदिग्दर्शनही अतिशय जबरदस्त असून प्रत्येकाला थिरकण्यास आणि सतत ऐकण्यास भाग पाडणारे हे गाणे संगीतप्रेमींच्या नक्कीच पसंतीस उतरेल. दरम्यान, श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत 'बाबू' चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, '' आज आमच्या 'बाबू' चित्रपटाच्या पोस्टरचे इतक्या भव्य रूपात अनावरण करण्यात आले. या चित्रपटाचे टायटल सॉन्गही प्रेक्षकांच्या भेटीला आहे. हे गाणे आणि यातील हूक स्टेप तरुणाईत नक्कीच लोकप्रिय होईल. कोरिओग्राफी, संगीत, शब्द आणि गायक या सगळ्याच गोष्टी अतिशय सुंदर जुळून आल्याने हे गाणे अधिकच धमाकेदार बनले आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे हे गाणे सगळीकडे तुफान गाजेल, हे नक्की.’’