Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*डॉक्टर आणि किरवंताच्या लढाईत कोण जिंकणार?*

*डॉक्टर आणि किरवंताच्या लढाईत कोण जिंकणार?* 'लाईफलाईन' चा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित डॉक्टरांचे आधुनिक विचार आणि किरवंतामध्ये खोलवर रुजलेली परंपरेची मुळे या दोघांमधील वैचारिक तफावत दाखवणारा 'लाईफलाईन' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टिझर पाहून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील जबरदस्त जुगलबंदी पाहाण्यासाठी प्रेक्षक आतुर असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अशोक सराफ, माधव अभ्यंकर, भरत दाभोळकर, हेमांगी कवी, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, सुश्रुत मंकणी, अवधूत गुप्ते यांच्या उपस्थितीत नुकताच 'लाईफलाईन' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला.
ट्रेलरमध्ये डॉक्टर आणि किरवंताची लढाई दाखवण्यात आली असून ज्ञान आणि विज्ञान एकत्र आले तर कित्येक गरजूंचे प्राण वाचू शकतील, या मताचे डॉक्टर आहेत तर माणसाच्या आयुष्यात दोनच जण महत्वाचे असतात, एक भगवंत जो जन्म देऊन खाली पाठवतो आणि दुसरा किरवंत जो निरोप देऊन वर पाठवतो, या विचारसरणीचे किरवंत आहेत. त्यामुळे या लढाईत कोण जिंकणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, आयुष्याचा प्रवास संपतो तेव्हा एका नवीन आयुष्याचा प्रवास सुरु होतो, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे. क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत 'लाईफलाईन' चित्रपटाचे दिग्दर्शन साहिल शिरवईकर यांनी केले असून कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत. तर अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायली आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक साहिल शिरवईकर म्हणतात, " दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि पहिल्याच चित्रपटात अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांसारखे दिग्गज कलाकार असणे, ही माझ्यासाठी खूपच मोठी गोष्टी आहे. व्यक्तिरेखा ठरल्यावर ज्यावेळी कलाकारांची निवड करण्याची वेळी आली, तेव्हा माझ्या मनात ही दोन नावे आधी आली. त्यानुसार मी अशोक सराफ सरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांच्या समोर अनेक चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स होत्या. सरांनी मला विचारले, एवढे चित्रपट असताना मी या चित्रपटाला होकार का द्यावा? यावर मी माझी स्क्रिप्ट त्यांना वाचून दाखवली आणि त्यामागची माझी भावनाही पटवून दिली. सरांचा होकार माझ्यासाठी फार आनंदाची बाब होती. चित्रपटातील सगळे कलाकार उत्कृष्ट आहेत. प्रत्येक कलाकाराची इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख आहे. चित्रपटाबद्दल सांगायचे तर आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरेमध्ये अडकलेला हा वाद आहे. आता या वादाचा शेवट कसा होतो, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. 'लाईफलाईन'च्या निमित्ताने सामाजिक जागरूकता पसरवण्याचाही प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे, माझा हा प्रयत्न प्रेक्षकांना आवडेल.''
तर अशोक सराफ म्हणतात, ‘’ ज्यावेळी साहिलने मला चित्रपटाबद्दल सांगितले, त्यावेळी स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी त्याला पहिला प्रश्न विचारला किरवंताची व्यक्तिरेखा कोण साकारणार आहे, त्यावेळी त्याने माधव अभ्यंकर यांचे नाव घेतले. तिथेच मला या मुलाची समज कळली. मला हा विषय आवडला. प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडणारा हा चित्रपट आहे. एक तरूण दिग्दर्शक असा चित्रपट बनवतोय, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे.’’

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.