*उत्कंठावर्धक 'लाईफलाईन'चा टिझर प्रदर्शित*
July 15, 2024
0
*उत्कंठावर्धक 'लाईफलाईन'चा टिझर प्रदर्शित*
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांची प्रमुख भूमिका असणारा 'लाईफलाईन' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान 'लाईफलाईन' चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर झळकला आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांच्यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही चुरस रंगणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात आता या टिझरने ही उत्सुकता अधिकच वाढवली आहे. अशोक सराफ आणि माधयव अभ्यंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे, पाहाण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.
क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत. तर अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायली आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट 'लाईफलाईन'चे निर्माते आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक साहिल शिरवईकर म्हणतात, "आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार, हे चित्रपट पाहूनच कळेल. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांसारखे दिग्गज या चित्रपटाला लाभले आहेत. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. ‘लाईफलाईन’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिने-सृष्टीतील दर्जेदार चित्रपटांच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे.''