*वेगळ्या वाटेवरचा दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील*
June 12, 2024
0
*वेगळ्या वाटेवरचा दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील*
मराठी चित्रपटांचा कॅनव्हास निश्चित मोठा झाला आहे. अलीकडच्या मराठी चित्रपटांकडे नजर टाकली तर त्यामागे अनेक तरुण चेहरे आहेत. मराठीत जे तरुण दिग्दर्शक येत आहेत ते नव्या तंत्रात, नव्या शैलीत कलाकृती सादर करत आपली क्षमता दाखवून देतायेत. वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज तसेच खिचिक, डॉक्टर डॉक्टर, ढिशक्यांव यासारख्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे युवा दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी असाच वेगळा प्रयत्न करीत रसिकांसाठी ‘अल्याड पल्याड’ हा रहस्यमय थरारपट आणला आहे. १४ जूनला हा चित्रपट राज्यभर प्रदर्शित होत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने प्रीतम एस के पाटील चमचमत्या चंदेरी, स्वप्नील दुनियेत पाऊल ठेवलं. या क्षेत्रातल्या प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी अनेक गोष्टी शिकून घेतल्या. त्यांच्यातली क्षमता आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याचा ध्यास यामुळे त्यांना नवं क्षितिजं खुणावत होतं, यातूनच दिग्दर्शनाची वाट त्यांना गवसली.
‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील सांगतात कि, मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मराठीत हॉरर विषय फारसे हाताळले जात नाहीत. काही मोजके थरारपट सोडले तर थरारपटांसाठी मराठी प्रेक्षकही हिंदी चित्रपटांकडे वळतो. म्हणूनच एक नवीन प्रयोग करण्यासाठी आणि मराठी चित्रपटांच्या आशयाला रहस्याचा जबरदस्त तडका देण्यासाठी मी ‘अल्याड पल्याड हा चित्रपट दिग्दर्शित केला.
शैलेश जैन आणि महेश निंबाळकर हे अतिशय मेहनती आणि जिद्दी निर्माते मला या चित्रपटासाठी लाभले. त्यामुळेच मला आत्मविश्वास मिळाला. हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज आहे, त्यामुळे मला खात्री आहे की, प्रेक्षकांना ‘अल्याड पल्याड’ चित्रपट नक्की आवडेल.
रहस्य आणि थरार यांची उत्तम सांगड घालत ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. सिनेमाची कथा पूर्ण झाल्यावर ती तितक्याच ताकदीनिशी रसिकांसमोर सादर करणाऱ्या तगड्या कलाकारांची आवश्यकता होती. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर आणि नवीन चेहरे भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या साथीने आम्ही ‘अल्याड पल्याड’ चित्रपट बनवला आहे.