*दादरच्या चित्रा थिएटरमध्ये पार पडला येड लागलं प्रेमाचं मालिकेचा शानदार प्रीमियर सोहळा*
May 28, 2024
0
*दादरच्या चित्रा थिएटरमध्ये पार पडला येड लागलं प्रेमाचं मालिकेचा शानदार प्रीमियर सोहळा*
*ढोल-ताश्यांच्या गजरात कलाकारांची दमदार एण्ट्री*
स्टार प्रवाह म्हणजे महाराष्ट्राची पहिली पसंती. स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांना भावतील आणि दैनंदिन आयुष्याचा भाग वाटतील अश्या मालिकेच्या कथा आणि घरातील सदस्य वाटावीत अशी पात्र उभी करुन रसिकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. मनोरंजनाचा हा प्रवाह असाच अखंडित ठेऊन नव्या मालिकांची पर्वणी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन येत आहे. घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं नंतर स्टार प्रवाहवर सुरु झालीय नवी मालिका येड लागलं प्रेमाचं. दादर येथील चित्रा थिएटरमध्ये नुकताच या मालिकेचा दमदार प्रीमियर सोहळा पार पडला. याप्रसंगी मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. ढोल-ताश्यांच्या गजरात कलाकारांचं आगमन झालं आणि मालिकेची पहिली झलक चित्रा थिएटरमध्ये संपूर्ण टीमने एकत्र पाहिली.
माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकतं ते प्रेम. प्रेमात समोरच्याला बदलण्याचा अट्टहास नसतो, जे जसं आहे ते अगदी तसं त्याच्या पूर्ण गुण-दोषांसकट स्वीकारणं म्हणजे प्रेम. येड लागलं प्रेमाचं ही मालिकाही प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी असेल. महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे. राया आणि मंजिरी या मालिकेतली प्रमुख पात्र. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे येड लागलं प्रेमाचं ही मालिका. दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता विशाल निकम, स्वाभिमान मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पुजा बिरारी, लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे या मालिकेत राया, जय आणि मंजिरीची भूमिका साकारताना दिसतील.
स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘येड लागलं प्रेमाचं ही मालिका प्रेमामुळे बदलत जाणारी माणसं आणि मानसिक स्थिती यावर भर देत हळुवार भावना उलगडत पुढे जाणारी आहे. प्रेक्षकांना मालिकेत भव्यदिव्य सीक्वेन्स बघायला मिळतील आणि करमणूक प्रधान कथा पुढे सरकत जाईल.’
राया या पात्राविषयी सांगताना अभिनेता विशाल निकम म्हणाला, ‘स्टार प्रवाह माझं कुटुंब आहे. या कुटुंबात पुन्हा एकदा सामील होतोय याचा खूप आनंद आहे. मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि हटके असं हे पात्र आहे. खऱ्या आयुष्यातही माझं आणि विठुरायाचं खास नातं आहे. माऊलींच्या आशीर्वादामुळेच इथवरचा प्रवास मी करु शकलो. माझ्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. या मालिकेची गोष्ट देखिल पंढरपुरात घडते. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो अशी भावना विशाल निकम याने व्यक्त केली.’
अभिनेता जय दुधाणे या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पोलिसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या अनुभवाविषयी सांगताना तो म्हणाला, ‘मी पहिल्यांदा पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारतोय. आव्हान खूप मोठं आहे. व्यायाम माझं पॅशन आहे. या भूमिकेसाठी शरीरयष्ठीवर जास्त मेहतन घेतोय. विशालसोबत याआधी काम केल्यामुळे आमची ओळख होतीच. पूजासोबत पण छान मैत्री जमली आहे. आम्हा तिघांचे सीन्स खूप छान होत आहेत. स्टार प्रवाहसोबतची पहिलीच मालिका असल्यामुळे मी जरा जास्त उत्सुक आहे.’
अभिनेत्री पुजा बिरारीने शूटिंगच्या निमित्ताने पहिल्यांदा बैलगाडी चालवली आहे या अनुभवविषयी सांगताना ती म्हणाली, 'बैलगाडा शर्यत शूट करायची असं ठरल्यापासून मनात खूप उत्सुकता होती. मी कधीच बैलगाडी चालवली नाहीय. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव घेण्याची खुपच उत्सुकता होती. पंढरपुरात आम्ही ही बैलगाडा शर्यत शूट केली. जवळपास ४ ते ६ दिवस या खास भागाचं शूट सुरु होतं. बैलगाडी नुसती चालवायची नव्हती तर ती शर्यतीत पळवायची होती. त्यामुळे खूप काळजी घेऊन शूट करावं लागत होतं. मी हा सीन बॉडी डबलची मदत न घेता केला. माझ्यासाठी हा अतिशय विलक्षण आणि अविस्मरणीय अनुभव होता. हा अनुभव माझ्या आठवणींच्या शिदोरीत कायम असेल.’
विशाल निकम, जय दुधाणे आणि पूजा बिरारीसोबतच मालिकेत नीना कुलकर्णी, अतिशा नाईक, उमेश नाईक, अभय राणे अशी दिग्गज कलाकार मंडळी आहेत. शैलेश शिर्सेकर दिग्दर्शकाची भूमिका पार पाडत असून सोल प्रोडक्शनने मालिकेची निर्मिती केली आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका येड लागलं प्रेमाचं रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.