*माधुरी दीक्षितलाही भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके'*
May 10, 2024
0
*माधुरी दीक्षितलाही भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके'*
सचिन पिळगावकर , सुप्रिया पिळगावकर यांनी केले चित्रपट पाहाण्याचे आवाहन
सुधीर फडके म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव. त्यांची सांगितिक कारकीर्द आपल्यापैकी अनेकांना ठाऊक आहे, परंतु त्यांचा इथंवर पोहोचण्याचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. अनेक चढउतार यादरम्यान आले. त्यांचा वैयक्तिक आयुष्याचा प्रवासही तितकाच रंजक होता. बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून अनेक मान्यवरांनी, समीक्षकांनी, प्रेक्षकांनी त्याला पसंती दर्शवली आहे.
परदेशातही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. कलाकारांचे, दिग्दर्शनाचे कौतुक होत असतानाच आता बॉलिवूडमधील आपली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेकांनी या चित्रपटाचे गोडवे गायले असून हा चित्रपट आवर्जून पाहाण्याचे आवाहनही केले आहे.
याबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, '' मनाला खूप समाधान मिळतेय, आमच्या सर्वांची मेहनत फळाला आली आहे. आज प्रेक्षकांकडून, इंडस्ट्रीकडून चित्रपटाचे, कलाकारांचे इतके कौतुक होत आहे. चित्रपट पाहिल्यावर अनेकांचे मेसेज, फोन येत आहेत. एखाद्या पुरस्कारापेक्षाही मोठी कौतुकाची थाप आहे. यासाठी सर्वांचे मनापासून आभार.''