Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'गोवर्धन'मध्ये अ‍ॅक्शनरूपात दिसणार भाऊसाहेब शिंदे.

'गोवर्धन'मध्ये अ‍ॅक्शनरूपात दिसणार भाऊसाहेब शिंदे... आगामी मराठी-हिंदी चित्रपटाची नुकतीच घोषणा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्ये नायक साकारत अवघ्या देशातील रसिकांचं लक्ष वेधून घेत सिनेसृष्टीत दाखल झालेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे नेहमीच नवनवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बबन' या बहुचर्चित चित्रपटामध्ये डॅशिंग भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेबचं 'रौंदळ' चित्रपटामधलं अ‍ॅक्शनरूप खऱ्या अर्थानं रसिकांना खिळवून ठेवणारं होतं. भाऊसाहेब आता पुन्हा एकदा अ‍ॅक्शन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाऊसाहेबची मुख्य भूमिका असलेल्या 'गोवर्धन' या आगामी मराठी-हिंदी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एन्टरटेन्मेंट या बॅनरअंतर्गत बाळासाहेब शिंदे आणि प्रमोद भास्कर चौधरी यांनी 'गोवर्धन' या चित्रपटाची निर्मिती केली असून राईज बिझनेस ग्रुप चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 'रौंदळ' या बहुचर्चित चित्रपटानंतर भाऊसाहेबचा 'गोवर्धन' हा आगामी अ‍ॅक्शनपटही मराठीसह हिंदीतही बनवण्यात येणार असून दिग्दर्शक गजानन नाना पडोळ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. गजानन नाना पडोळ यांनी यापूर्वी 'रौंदळ'चे यशस्वी दिग्दर्शन केले होते. 'गोवर्धन' या चित्रपटाचं नवं कोरं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरवर गोवर्धनच्या भूमिकेत भाऊसाहेब दिसणार असल्याचं लिहिलं आहे. पोस्टरवरील भाऊचा अँग्री यंग मॅनसारखा लूक लक्ष वेधून घेतो.
भाऊसाहेबने नेहमीच आपल्या मातीतील सिनेमे बनवण्याला प्राधान्य दिलं आहे. 'गोवर्धन' हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. पोस्टर पाहिल्यावर याची खात्री पटते. या चित्रपटात भाऊसाहेबचे गायी-वासरांचं रक्षण करणाऱ्या 'गोवर्धन'चं रूप पाहायला मिळणार आहे. वासराला पाठीला बांधून खलनायकाला कंठस्नान घालण्यासाठी सज्ज झालेला नायक 'गोवर्धन'च्या पोस्टरवर दिसतो. रक्तानं माखलेला शर्ट, कपाळाला टिळा आणि जखम, वाढलेली दाढी-मिशी, पाठीला बांधलेलं गायीचं वासरू, डाव्या हातात शस्त्र असा 'गोवर्धन'चा लूक पोस्टरवर पाहायला मिळतो. याखेरीज दोन गायीसुद्धा पोस्टरवर आहेत. हे सर्व पाहिल्यावर या चित्रपटाच्या निमित्ताने भाऊसाहेब महाराष्ट्रातील एका ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सज्ज झाल्याचं जाणवतं. 'गोवर्धन'बाबत भाऊसाहेब म्हणाला की, या चित्रपटात पुन्हा एकदा अॅक्शन रूपात दिसणार असलो तरी हा विषय खूप वेगळा आणि संवेदनशील आहे. तुमच्या आमच्या रोजच्या सामाजिक जीवनातील मुद्दे या चित्रपटात मोठ्या धाडसाने मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. देशातील भयाण वास्तव रुपेरी पडद्यावर सादर करत समाजाला आरसा दाखवण्याचं कामही हा चित्रपट करेल यात शंका नाही. हिंदू धर्मात गायीला माता मानली जाते. तिच्या ठायी तेहतीस कोटी देवांचं वास करत असल्याचं मानलं जातं. त्याच गोमातेच्या रक्षणार्थ उभ्या ठाकलेल्या नायकाची कथा 'गोवर्धन'मध्ये आहे. या निमित्ताने समाजातील इतरही मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार असल्याचं भाऊसाहेब म्हणाला. या चित्रपटातील इतर कलाकारांच्या नावांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. लवकरच याबाबतची माहितीही रिव्हील करण्यात येणार आहे. रिलीज करण्यात आलेल्या 'गोवर्धन'च्या पोस्टरवर नेटकरी बेहद्द खूश असून, एक वेगळा विषय हाताळत असल्याने भाऊसाहेबचं विविध स्तरांतून कौतुक केलं जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.