रितिका श्रोत्री अभिनित 'द लाईट कॅचर' एकांकीकेची 'भारत रंग महोत्सव'मध्ये बाजी, अभिनेत्री दिल्लीनंतर पुण्यात गाजवणार रंगमंच
March 20, 2024
0
*रितिका श्रोत्री अभिनित 'द लाईट कॅचर' एकांकीकेची 'भारत रंग महोत्सव'मध्ये बाजी, अभिनेत्री दिल्लीनंतर पुण्यात गाजवणार रंगमंच*
कलाकार असाच घडत नाही. त्यामागे असलेली कलाकारांची मेहनत ही त्या कलाकाराला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवते. आजवर सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी अभिनयाची आवड जोपासत विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. अशीच एक अभिनेत्री म्हणजे रितिका श्रोत्री. रितिकाला आजवर आपण अनेक चित्रपटात काम करताना पाहिलंच आहे. पण तिच्या रंगमंचावरील प्रवासाबाबत फार कमी जणांना ठाऊक असेल. या प्रवासाबाबत रितिका म्हणाली, "वयाच्या सहाव्या वर्षांपासून रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. मला अस वाटतं नाटकात काम करुन खऱ्या अर्थाने एखादा अभिनेता तयार होतो. कारण इथे काम करताना प्रत्येक प्रयोग नवा असतो".
मराठी, हिंदी, इंग्लिश या तीनही भाषांमध्ये जवळपास १५च्या वर नाटक करत तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. १९९९ सालापासून नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली अंतर्गत सुरु झालेल्या 'भारत रंग महोत्सव' किंवा 'द नॅशनल थिएटर फेस्टिव्हल'मध्ये रंगमंच गाजवण्यास महाराष्ट्राची लाडकी लेक सज्ज झाली आहे. रितिकाच्या इंग्लिश व हिंदी भाषेत असलेल्या 'द लाईट कॅचर' या एकपात्री नाटकाची या फेस्टिव्हलसाठी मोठ्या प्रक्रियेतून निवड झाली आहे. 'एनएसडी' येथे रितिकासाठी चालून आलेली संधी म्हणजे सोन्याहून पिवळं होती असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
'द लाईट कॅचर' या एकांकिकेतून अभिनेत्री रितिका श्रोत्री हिने तब्बल १२ विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. या नाटकात एक छायाचित्रकार तिने काढलेल्या विविध फोटोंमागची कथा सांगते. एक उत्तम गोष्ट व एक उत्तम अनुभव या नाटकाद्वारे प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. ही एकांकिका निरंजन पेडणेकर लिखित व संकेत पारखे दिग्दर्शित आहे. या एकांकिकेचा NSD येथील प्रयोग सफल झाल्यानंतर आता पुण्यातही ही एकांकिका रंगमंच गाजवणार आहे.
पुण्यात या एकांकिकेचा प्रयोग येत्या २९ मार्च २०२४ रोजी 'श्रीराम लागू रंग-अवकाश, ज्योत्स्ना भोळे सभागृहच्या खाली, हिराबाग चौक, टिळक रोड' येथे होणार आहे. सदर प्रयोगाचे बुकिंग ७०५८८८३०४९ या मोबाईल क्रमांकावर उपलब्ध आहे, याची नोंद घ्यावी. Theatron entertainment प्रस्तुत, रितिका श्रोत्री अभिनित या एकांकिकेला याआधी 'राजा परांजपे करंडक', 'सोलो फेस्टिवल', 'गुड थिएटर इंटरनॅशनल फेस्टिवल' आणि 'थेस्पो' मध्ये अनेक पारितोषिक मिळाली आहेत.