Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४ मध्ये या कलाकारांनी पटकावले पुरस्कार

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४ मध्ये या कलाकारांनी पटकावले पुरस्कार ठरलं तर मग महाराष्ट्राची महामालिका, प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता ठरली सर्वोत्कृष्ट आई तर वैदेही परशुरामी आणि बालकलाकार सारा पालेकरला सर्वोत्कृष्ट निवेदकाचा पुरस्कार
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२४ नुकताच जल्लोषात पार पडला. पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं हे चौथं वर्ष. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण अश्या या सोहळ्यात महाराष्ट्राची महामालिका ठरली ठरलं तर मग. प्रेक्षकांनी केलेल्या भरघोस व्होटच्या माध्यमातून ठरलं तर मग ला महामालिकेचा पुरस्कार बहाल करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार देण्याचा मान महामालिकेसाठी व्होट करणाऱ्या तीन भाग्यवान प्रेक्षकांना देण्यात आला. मराठी टेलिव्हिजच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या हस्ते कलाकारांना पुरस्कार देण्यात आला.
आपल्या खुमासदार सूत्रसंचलनाने संपूर्ण महाराष्ट्रात धिंगाणा घालणाऱ्या सिद्धार्थ जाधवला महाराष्ट्राचा धमाका या पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर लग्नाची बेडी मालिकेतील सिंधू ठरली महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. पिंकीचा विजय असो मालिकेतील पिंकी आणि युवराज ठरले महाराष्ट्राची लक्षवेधी जोडी.
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सुनेचा पुरस्कार पटकावला मुरांबा मालिकेतील रमाने, तर अबोली मालिकेतील अबोलीची सासू म्हणजेच रमा आई ठरली सर्वोत्कृष्ट सासू. सर्वोत्कृष्ट पती ठरला मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील सार्थक तर सर्वोत्कृष्ट पत्नीचा पुरस्कार शुभविवाहच्या भूमीला देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट आई या पुरस्काराची मानकरी ठरली प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता आणि मन धागा धागा मालिकेतील अण्णा ठरले सर्वोत्कृष्ट बाबा. लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेतील कलाला सर्वोत्कृष्ट मुलगी हा पुरस्कार देण्यात आला.
ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन सायलीला सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार देण्यात आला. तर आपल्या स्टायलिश अंदाने प्रेक्षकांची मन जिंकणारे नित्या-अधिराज ठरले सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी पुरस्काराचे विजेते. सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार शुभविवाह मालिकेतील रागिणी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेतील सावनी यांना विभागून देण्यात आला. लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेतील कला, नयना आणि काजल यांना सर्वोत्कृष्ट भावंडं पुरस्कार देण्यात आला तर ठरलं तर मग मालिकेतील सुभेदार कुटुंब ठरलं सर्वोत्कृष्ट परिवार.
सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य हा पुरस्कार प्रेमाची गोष्ट मालिकेतील सागर आणि कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतील गुंजाला देण्यात आला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात फेव्हरेट ग्लॅमरस फेस ठरली प्रेमाची गोष्ट मालिकेतील सावनी आणि तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मल्हार. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या कार्यक्रमासाठी वैदेही परशुरामी आणि बालकलाकार सारा पालेकरला सर्वोत्कृष्ट निवेदकाचा पुरस्कार बहाल करण्यात आला.
स्टार प्रवाह परिवार पुरस्कारासाठी श्रीरंग गोडबोले, मंगल केंकरे, विजय पाटकर, वैजयंती आपटे, मिलिंद इंगळे यांनी परिक्षणाची धुरा सांभाळली. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.