Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*१८ मार्चपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नात्यांचं महत्त्व सांगणारी नवी मालिका घरोघरी मातीच्या चुली*

*१८ मार्चपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नात्यांचं महत्त्व सांगणारी नवी मालिका घरोघरी मातीच्या चुली* *पुण्याच्या ढेपे वाड्यामध्ये पार पडली मालिकेची पत्रकार परिषद*
कवयित्री विमल लिमये यांची 'घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,' ही कविता सर्वांच्याच परिचयाची आहे. या कवितेतील ओळींचा नव्याने विचार करायला लावणारी आणि नात्यांचं महत्त्व पटवून देणारी नवी मालिका स्टार प्रवाहच्या परिवारात दाखल होतेय. मालिकेचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली. मालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हण्टलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या मालिकेची पत्रकार परिषद नुकतीच पुण्याच्या ढेपे वाड्यात पार पडली. वाडा म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती, वाडा म्हणजे पिढ्यानपिढ्या एकत्र नांदणारी वास्तू, वाडा जिथे सणवार ‘एकट्याने नाही तर ‘एकत्र’ साजरे होतात, वाडा जिथे घराचं गोकुळ होतं. रणदिवे कुटुंब म्हणचे गोकुळच. म्हणूनच या कुटुंबासोबतची खास भेट ढेपे वाड्यात करण्यात आली. या खास क्षणी हृषिकेश-जानकीच्या लग्नाचा १० वा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे, निर्माते सुचित्रा बांदेकर, आदेश बांदेकर आणि सोहम बांदेकर तसेच सविता प्रभुणे, नयना आपटे, रेश्मा शिंदे, सुमीत पुसावळे, प्रतीक्षा मुणगेकर, आशुतोष पत्की, अक्षय वाघमारे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे, गीता निखाग्रे, बालकलाकार आरोही सांबरे आणि दिग्दर्शक राहुल लिंगायत उपस्थित होते. नव्या वर्षातल्या या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, ‘स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच नातेसंबंधांबद्दल भाष्य करणाऱ्या मालिका सादर करत असते. रसिकांच्या अवती भवती होणाऱ्या गोष्टी मालिकेत दिसल्या की त्या आपल्याशा वाटतात. घरोघरी मातीच्या चुली ही म्हण आपल्या सगळ्यांना माहित आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतात. कुटुंब म्हण्टलं की माणसं आली, भांड्याला भांडं लागणारच. पण म्हणून कोणी आपल्या माणसांना अंतर देत नाही. प्रत्येकाला सांभाळून आपण पुढे जातो. जो हिंमत ठेवतो, ज्याला माणसं जोडून ठेवता येतात तो जिंकतो. ही मालिका सुद्धा अशीच आहे नात्यांवर भाष्य करणारी. कोणत्याही परिस्थितीत दोष व्यक्तींचा नाही तर परिस्थितीचा असतो असं समजून घर टिकवणारी. तोडणं फार सोपं असतं, कठीण असतं ते जोडून ठेवणं.’ घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकी हे महत्त्वाचं पात्र साकारणार आहे अभिनेत्री रेश्मा शिंदे. या नव्या भूमिकेविषयी सांगताना रेश्मा म्हणाली, ‘रंग माझा वेगळा मालिकेतल्या दीपावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. रंग माझा वेगळा ही मालिका माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. मालिका संपल्यानंतर माझ्या करिअरच्या पुढच्या टप्प्यात काय असेल याची प्रेक्षकांप्रमाणेच मलाही उत्सुकता होती. स्टार प्रवाहने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेऊन जानकी साकारण्याची संधी दिली आहे. जानकी अत्यंत साधी, मनमिळावू, समंजस, लाघवी स्वभावाची आणि सर्वांनां समजून घेणारी आहे. तिचा एकत्र कुटुंब पद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब नेहमी एकत्र असावं यासाठी तिची धडपड असते. मी स्वत: आजी-आजोबांच्या संस्कारात वाढले. सध्या करिअरच्या निमित्ताने म्हणा, किंवा स्वेच्छेने म्हणा विभक्त कुटुंब पहायला मिळतात. जर एकत्र कुटुंब पद्धत टिकवायची असेल तर आपली माणसं, आपली नाती जपणं ही काळाची गरज आहे. सुख-दु:खाच्या प्रसंगात हीच नाती आपली सोबत पुरवतात. म्हणूनच नात्यांची गोष्ट सांगणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका मला खूप भावली. माझ्या स्टार प्रवाहच्या परिवारात पुन्हा येतेय याचा वेगळा आनंद आहे. अशी भावना रेश्माने व्यक्त केली.’
घरोघरी मातीच्या चुली मालिकेतल्या हृषिकेश या पात्राविषयी सांगताना सुमीत पुसावळे म्हणाला, ‘स्टार प्रवाह कुटुंबाचा सदस्य होतोय याचा मनापासून आनंद आहे. मी याआधी साकारलेल्या भूमिकेतून बाहेर पडून काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतोय. ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकेनंतर कौटुंबिक मालिकेत काम करण्याचा अनुभव घेतोय त्यामुळे प्रेक्षकांप्रमाणेच मी देखिल उत्सुक आहे. या मालिकेकडे पहाण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच वेगळा आहे. खूप चांगले कलावंत मालिकेत आहेत. एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे. मला असं वाटतं एकत्र कुटुंब ही रणदिवे कुटुंबाती खरी ताकद आहे. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय, की एक लाकडाची काठी तोडणं सोपं आहे मात्र लाकडाची मोळी तोडणं तितकंच अवघड. त्यामुळे कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका घरोघरी मातीच्या चुली १८ मार्चपासून सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.