अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या पोस्टरचे दिमाखदार अनावरण
March 18, 2024
0
*‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या पोस्टरचे दिमाखदार अनावरण*
*थरारपटाची पहिली झलक प्रेक्षक भेटीला*
मराठी चित्रपटसृष्टीत वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती सातत्याने होताना दिसते आहे. आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणारा प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित ‘अल्याड पल्याड' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. एस. एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड' चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली आहे. प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पोस्टरने आणि उत्कंठावर्धक टिझरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, अनुष्का पिंपुटकर आदी अनुभवी कलाकारांसोबत भाग्यम जैन हा नवा चेहरा या चित्रपटात दिसणार आहे.
आपला महाराष्ट्र हा समृद्धतेने आणि विविधतेने नटलेला आहे. त्यात अनेक जुन्या संस्कृती तसेच प्रथा परंपरा आहेत. अशाच एका वेगळ्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या एका गावाची, तिथल्या माणसांची कथा सांगणारा ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. चित्रपटाची कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत.
पोस्टर आणि टिझर अनावरण प्रसंगी बोलताना दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील म्हणाले की,वेगळ्या विषयावरचा ‘अल्याड पल्याड' चित्रपट करताना खूप मजा आली. प्रेक्षकही हा चित्रपट तितकाच एन्जॉय करतील. उत्तम कलाकारांच्या टीमसोबत एका वेगळ्या विषयावर चित्रपट करण्याची संधी आम्हाला महत्त्वाची वाटल्यामुळे चित्रपट निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी यावेळी सांगितले. ‘एका चांगल्या चित्रपटाचा भाग होता आल्याचा आनंद अभिनेता गौरव मोरे ने व्यक्त केला.
‘शूटिंग करताना आम्ही धमाल केली ती धमाल पदड्यावर प्रेक्षकांना नक्की आनंद देईल, असा विश्वास अभिनेता सक्षम कुलकर्णीने व्यक्त केला. उत्तम कलाकारांसोबत काम करताना मला खूप काही शिकायला मिळाल्याच सांगताना, हा चित्रपट करणं माझ्यासाठी सुवर्णसंधी असल्याचं भाग्यम जैनने सांगितलं. दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांच्यासोबत काम करणं मी माझ्यासाठी नेहमीच आनंददायी असल्याचं अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी सांगितलं.
‘अल्याड पल्याड' चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे तर संकलन सौमित्र धरसुलकर यांचे आहे. कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे. कार्यकारी निर्माते संतोष खरात आहेत.