Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अवखळ इंदूच्या भेटीसाठी महाराष्ट्र आतूर…*

*अवखळ इंदूच्या भेटीसाठी महाराष्ट्र आतूर…* “इंद्रायणी” च्या शीर्षकगीताला रसिकांची प्रचंड दाद
अवघ्या महाराष्ट्राला सध्या जे कोडं पडलंय .. कोण आहे इंदू? तर इंदू अर्थातच कलर्स मराठी वाहिनीवर २५ मार्चपासून अवतरणारी ही आहे, “इंद्रायणी” ! इंद्रायणी म्हणजे अख्ख्या गावाची लाडकी इंदू.… एक निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ आणि तितकीच विचारी मुलगी. वय लहान परंतु बुद्धी मात्र मोठ्यांनाही अचंबित करणारी!! इंदूच्या निरागस तरी मार्मिक प्रश्नांनी भल्याभल्यांना प्रोमोतच निरूत्तर केलंय आणि तितकंच तिचं अस्सल नि अवखळ बालपण अनेकांना आपल्या बालपणाची आठवणही करून देतंय. म्हणून या इंदूच्या भेटीसाठी रसिकांना उत्कंठा लागून राहिलीय. आता या मालिकेचं एक गोड शीर्षकगीत रसिकांच्या भेटीला आलंय आणि इंदूइतकंच तेही लोकांना खूप आवडतंय. “गीत तुझं डोलण्याचं, वाऱ्यासंगं हालण्याचं..पाखरांशी बोलण्याचं, चांदण्यात चालण्याचं!! “ असे या शीर्षकगीताचे बोल आहेत. इंदूचं भावविश्व मांडणारं हे अर्थपूर्ण शीर्षकगीत लिहिलंय, प्रसिद्ध गीतकार आणि कवी दासू वैद्य यांनी तर ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी ते संगीतबद्ध केलंय. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र हिने हे गीत गायलंय. हे गाणं कलर्स मराठीच्या फेसबुक पेजवर आणि युट्युबवर रसिकांना पाहायला मिळेल.
“ इंद्रायणी” मालिकेच्या प्रत्येक प्रोमोने रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचवलीय. कारण यात इंदूची भूमिका करणारी बालकलाकार साताऱ्याची सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरतेय. तसंच गुणी अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना पुन्हा एकदा सुखद धक्का देतील. या दोन तगड्या कलाकारांबरोबर “जय जय स्वामी समर्थ “ मध्ये चोळप्पाच्या भूमिकेद्वारे रसिकांची मनं जिंकणारा स्वानंद बर्वे हा कलाकारही या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचं लेखन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अभिनेता चिन्मय मांडलेकर करत आहे. तर या मालिकेचे दिग्दर्शक आहेत, विनोद लव्हेकर. ‘जीव झाला येडापिसा’ , ‘राजारानीची गं जोडी’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणाऱ्या पोतडी एंटरटेनमेंट या मालिकेची निर्मिती करत असून याच मालिकांचे दिग्दर्शक विनोद लव्हेकर “इंद्रायणी”चे दिग्दर्शन करत आहेत.
अवघा महाराष्ट्र जिची आतुरतेने वाट पहातोय, ती “ इंद्रायणी“ महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठीवर २५ मार्चपासून सायं ७ वाजता अवतरणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.