*आणि तिला अश्रू अनावर झाले...*
February 12, 2024
0
*आणि तिला अश्रू अनावर झाले...*
डिलिव्हरी बॉय पाहताना महिला झाल्या भावूक
लुसिया एंटरटेनमेंट प्रॅाडक्शन निर्मित, सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून विकेण्डला अनेक ठिकाणी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चित्रपटाची टीम चित्रपटगृहांना सध्या भेटही देत आहे. नुकताच अभिनेत्री अंकिता लांडे पाटील हिने चित्रपटगृहाला भेट देऊन प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी ही कथा भावली असल्याचे सांगितले. काही महिला चित्रपट पाहून अतिशय भावुक झाल्या तर काही महिलांनी यावेळी आपले अनुभव शेअर केले. हे अनुभव शेअर करताना काहींना अश्रुही अनावर झाले.
हसता हसता पटकन डोळ्यांत पाणी आणणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय. सरोगसीवर भाष्य करणाऱ्या या कथेचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले असून दिग्दर्शक मोहसीन खान यांनी केले आहे. प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांनी उत्तम अभिनय केला असून 'डिलिव्हरी बॉय' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय.