‘ही अनोखी गाठ’मधील 'सखी माझे देहभान' गाणे प्रदर्शित
February 21, 2024
0
*‘ही अनोखी गाठ’मधील 'सखी माझे देहभान' गाणे प्रदर्शित*
झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज निर्मित 'ही अनोखी गाठ' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींशी एक अनोखी गाठ बांधत आहेत. पहिल्या गाण्याला भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 'सखी माझे देहभान' असे बोल असणारे हे गाणे गौरी इंगवले हिच्यावर चित्रित झाले असून यानिमित्ताने गौरीचा नृत्याविष्कार पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना अनुभवता येणार आहे. वैभव जोशी यांचे भावपूर्ण बोल लाभलेल्या या गाण्याला हितेश मोडक यांचे संगीत लाभले आहे. सलमान अली आणि हितेश मोडक यांच्या गायकीने गाण्याला एक वेगळेच स्वरूप आले आहे.
या चित्रपटात श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, सुहास जोशी, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका असून या चित्रपटाचे संवाद सिद्धार्थ साळवी यांनी लिहिले आहेत. येत्या १ मार्च रोजी 'ही अनोखी गाठ' प्रेक्षकांशी बांधली जाणार आहे.
या गाण्याबद्दल महेश मांजरेकर म्हणतात, "अर्थपूर्ण बोल लाभलेल्या गाण्याला संगीतही त्याच ताकदीचे लाभले आहे. या गाण्यात अनेक भावना दडल्या आहेत. मुळात गौरी एक उत्कृष्ट नर्तिका असल्याने तिच्या हावभावातून अनेक गोष्टी व्यक्त होतात. या गाण्यातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गाणे चित्रपटाचा आत्मा असतो, त्यामुळे चित्रपटाच्या कथेइतकेच महत्व गाण्यांनाही आहे आणि ही जबाबदारी वैभव जोशी आणि हितेश मोडक यांनी लीलया पार पाडली आहे. संगीतप्रेमींना ही गाणेही आवडेल, यात शंका नाही.''
झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, '' या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली असून ही दोन्ही गाणी श्रवणीय आहेत. वेगळ्या धाटणीची आहेत. या गाण्यातही प्रेम, विरह अशा विविध भावना आहेत. त्यात या गाण्याला मोहक नृत्य अदाकारी लाभली आहे. थेट मनाला स्पर्श करणारे हे गाणे आहे.''