सहाय्यक अभिनेता ते मुख्य नायक...साधी माणसं मालिकेतील आकाश नलावडेचा थक्क करणारा प्रवास
February 25, 2024
0
सहाय्यक अभिनेता ते मुख्य नायक...साधी माणसं मालिकेतील आकाश नलावडेचा थक्क करणारा प्रवास
स्टार प्रवाहच्या सहकुटुंब सहपरिवार मालिकेमुळे आकाश पोहोचला घराघरात
स्टार प्रवाहच्या सहकुटुंब सहपरिवार मालिकेतल्या पश्याला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. कुटुंबावर मनापासून प्रेम करणारा पश्या अल्पावधीतच प्रेक्षकांचा लाडका झाला. मालिका संपली तरी पश्या या व्यक्तिरेखेविषयी वाटणारा जिव्हाळा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी पश्या म्हणजेच अभिनेता आकाश नलावडे पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. लवकरच स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या साधी माणसं या मालिकेत आकाश सत्या हे मुख्य नायकाचं पात्र साकारणार आहे. पश्यासाठी हा प्रवास स्वप्नवत आहे. मुळचा पुण्याचा असलेल्या आकाशने सावित्रीबाई फुले विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी घेतली.
अनेक मालिका आणि प्रायोगिक नाटकांमधून छोटी मोठी काम केल्यानंतर आकाशला सहकुटुंब सहपरिवारसाठी विचारणा झाली. मालिकेतलं पश्या हे पात्र सुपरहिट झालं. आकाश आता सत्याच्या रुपात प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. सत्या आणि नशिबाचा ३६ चा आकडा आहे. डॉक्टर व्हायचं त्याचं स्वप्न होतं पण गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करतो. स्वत:च्या धुंदीत रहाणारा सत्या मनाने मात्र खूप चांगला आहे. जगात चांगली आपली सांगली असं आत्मविश्वासाने मिरवणाऱ्या सांगली शहरात या मालिकेची गोष्ट घडते. मीरा आणि सत्या या गोष्टीतली दोन मुख्य पात्र. एकाच गावात रहात असले तरी स्वभाव मात्र टोकाचे. अश्या या विभिन्न स्वभावाच्या मीरा आणि सत्यामध्ये नियती नेमका कोणता खेळ करणार याची गोष्ट म्हणजे साधी माणसं ही मालिका.
अभिनेता आकाश नलावडे ही नवी भूमिका साकरण्यासाठी खूपच उत्सुक आहे. पश्या या माझ्या भूमिकेला खूप प्रेम मिळालं. या भूमिकेने मला घराघरात पोहोचवलं. तेच प्रेम सत्यालाही मिळेल ही अपेक्षा आहे. या मालिकेतला माझा लूकही खूप वेगळा आहे. साध्या माणसांची ही गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असं आकाश म्हणाला. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका साधी माणसं १८ मार्चपासून सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.