*ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार -२०२३ प्रदान*
February 24, 2024
0
*ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार -२०२३ प्रदान*
*'अष्टपैलू' अशोक सराफ हे मराठी मातीतील अस्सल हिरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
*जगाला हेवा वाटेल अशी मुंबईची फिल्मसिटी बनवण्याचा प्रयत्न*
मुंबई: आपल्या अविस्मरणीय भूमिकांनी अष्टपैलू असणाऱ्या अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची अभिरुची संपन्न केली. अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी पोट धरुन हसवले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही त्यांनी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाही. खऱ्या अर्थाने ते मराठी मातीतील अस्सल हिरा आहेत, अशा भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कार्याचा गौरव केला. मराठी चित्रपटसृष्टी साठी जे जे आवश्यक आहे, त्या सर्व सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्याचा आणि जगाला हेवा वाटेल अशी फिल्मसिटी आपण तयार करू, असे प्रतिपादन त्यांनी केले.
महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा "गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार" ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान आज करण्यात आला.त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते. याशिवाय, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. या समारंभास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मनीषा कायंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे, म्हणाले की, अष्टपैलू, हा शब्द ज्याला खऱ्या अर्थाने ज्यांना लागू होतो ते नाव म्हणजे अशोक सराफ आहे. सलग ५० वर्षे असंख्य भूमिका करुनही ज्यांच्यात अभिनयाची आणि नवं काही तरी करून दाखविण्याची त्यांची भूक अजूनही कायम आहे. अशोक सराफ हे वयाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येतोय, हा अवघ्या महाराष्ट्रासाठी केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ समाजसेवक, निरुपणकार तिर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्याची संधी मला मिळाली. यावर्षी अशोक सराफ यांचा आपण गौरव करत आहोत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर राज्य केले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही सराफ यांनी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाही, असे त्यांनी सांगितले. मराठी रसिकांनीही त्यांच्या अभिनयावर भरभरुन प्रेम केले. त्यांच्याप्रमाणेच सुरेश वाडकर यांनी अत्यंत कष्टपूर्वक आपली सांगितीक कारकीर्द उभी केली. मराठी आणि हिंदीच नव्हे तर विविध भाषांतील त्यांची गाणी विशेष गाजली. सुरेशजींचा सुरेल आवाज आजही आपल्याला मंत्रमुग्ध करतो, अशा शब्दात त्यांनी ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा गौरव केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईतल्या फिल्मसिटीत शुटीगसाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच, मुंबई फिल्मसिटीबाहेर इतर जिल्ह्यात चित्रपटाची शुटींग करायची असेल तर 'वन विंडो सिस्टीम'चा निर्णय सांस्कृतिक विभागाने घेतलाय. या शुटींगसाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. राज्यात ७५ नावे चित्र नाट्यगृह उभरण्यासाठी ९ कोटी ३३ लाखाचा निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले.
*अशोक सराफ हे मराठी चित्रपटाचा चेहरा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
आजचा दिवस सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. चित्रपट पुरस्कारांचा बॅकलॉग भरून काढला. आज आपले कलाविश्र्व समृध्द करणारे अनेक मोठे कलावंत येथे आहेत. चित्रपट सृष्टीला आणि आपल्या जीवनाला समृध्द करणारी ही मंडळी आहेत. अशोक सराफ यावर्षी ७५ वर्षाचे झालेत. त्यांच्या अमृत महोत्सवात आपण त्यांना महाराष्ट्र भूषण देत आहोत. मराठी चित्रपटाचा चेहरा हे अशोक सराफ आहेत, अशी भावना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
ते म्हणाले की, मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी, नाटक यामध्ये सर्व पद्धतीच्या भूमिका अशोक सराफ यांनी साकारल्या. त्यांनी साकारलेला नायक हा स्वप्नातील नव्हे तर खऱ्याखुऱ्या जीवनातील नायक वाटायचे. त्यांचे चित्रपट पाहून आम्ही मोठे झालो. याशिवाय, सुरेश वाडकर यांनी गेल्या कित्येक वर्षे त्यांच्या सुरेल आवाजाने रसिकांचे मनोरंजन केले. ज्या लोकांनी आपले जीवन आनंदमय केले, त्यांना पुरस्कार देण्याची संधी आपल्याला मिळाली, अशी भावनाही यांनी यावेळी व्यक्त केली.
*महाराष्ट्राची भूमी ही कलाकारांची खाण: मंत्री सुधीर मुनगंटीवार*
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्र हे जसे आर्थिक शक्तिकेंद्र आहे तसे ते सांस्कृतिक शक्तिकेंद्र आहे. महाराष्ट्राची भूमी ही आता कलाकारांची खाण झाली आहे. या कलावंतांचा सन्मान करताना सांस्कृतिक कार्य विभाग सोनेरी झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
फिल्मसिटीच्या बाहेर जिथे चित्रीकरण असेल तिथे शुल्क आकारले जाणार नाही. मनोरंजन करातून सुट या अगोदरच दिली असल्याचे सांगून जगातील सर्वात उत्तम फिल्मसिटी करू शकतो, असा विश्वास मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
*रसिक प्रेक्षकांचे प्रेम कायम हृदयात राहील: अशोक सराफ*
महाराष्ट्रातील एक क्रमांकाचा पुरस्कार तुम्ही मला दिलात, याचा खरोकर आनंद आहे. माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमी ने माझा गौरव केला. महाराष्ट्र भूषण मिळणाऱ्यांची यादी भाली मोठी. त्यात मला स्थान दिले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पन्नास वर्षात प्रवासात ज्यांनी मला कळत नकळत का होईना त्यांनी मदत केली आहे, ही सगळी त्यांची किमया आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रसिक प्रेक्षक. जे आवडले तर डोक्यावर घेतात. रसिकांना आवडलं पाहिजे हाच दृष्टीकोन ठेवला. रसिकांनी प्रेम दिले. ते उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. माझ्या ह्रदयात हे प्रेम कायम राहील, अशी भावना यावेळी अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
*लतादीदींच्या नावे पुरस्कार हा आशीर्वाद: सुरेश वाडकर*
यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लताजींच्या नावाचा पुरस्कार हा आशीर्वाद आहे. आजही लतादीदी आपल्यात आहेत, हीच भावना असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव श्री. खारगे यांनी केले. सांस्कृतिक दृष्ट्या समृध्द असे आपले राज्य आहे. महान सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यात कलावंतांचा मोठा वाटा आहे. विविध सांस्कृतिक पुरस्कार, महोत्सव आयोजित करून व्यासपीठ निर्माण करण्याचे काम राज्य शासन करीत आहे.तीन वर्षाचे पुरस्कार यावर्षी देत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि मान्यवरांच्या हस्ते राजकपूर जीवनगौरव पुरस्कार २०२० ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुणा इराणी, सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना प्रदान करण्यात आला. तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक जे. पी. दत्ता, सन २०२१ साठी ख्यातनाम गायक सोनू निगम आणि सन २०२२ साठी विधू विनोद चोप्रा यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावतीने त्यांचे स्नेही श्री. विजय यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते स्व. रविंद्र महाजनी (मरणोत्तर), सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा चव्हाण आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्व. रवींद्र महाजनी यांचा पुरस्कार त्यांचे पुत्र गश्मिर महाजनी यांनी तर श्रीमती उषा चव्हाण यांच्यावतीने विजय कोंडके यांनी पुरस्कार स्वीकारला.
चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, सन २०२१ साठी ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे आणि सन २०२२ साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी चित्रपट समीक्षक अशोक राणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचलन अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी केले.