प्लॅनेट मराठी ओटीटी येणार आता नवीन रूपात
February 07, 2024
0
*प्लॅनेट मराठी ओटीटी येणार आता नवीन रूपात*
*अभिजित पानसे डायरेक्टर कॉन्टेन्ट बोर्डवर*
*अभिजित पानसे, श्रीरंग गोडबोले यांच्या नवीन वेबसीरिजची घोषणा*
जगातील पहिले मराठी ओटीटी हा मान मिळवणाऱ्या 'प्लॅनेट मराठी'ने आपल्या जगभरातील मराठी प्रेक्षकांना कायमच दर्जेदार कॉन्टेन्ट दिला. अनेक उत्कृष्ट चित्रपट, वेबफिल्म्स, वेबसीरिज, शॉर्ट फिल्म्स त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्या. अनेक चित्रपटांनी चित्रपट महोत्सव, राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवली. आता प्लॅनेट मराठीने पुन्हा एकदा विस्तार करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे आणि याचाच भाग म्हणून प्लॅनेट मराठीच्या डायरेक्टर कॉन्टेन्ट बोर्डवर अभिजित पानसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजीत पानसे यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांसाठी लेखन, दिग्दर्शन केले आहे. त्यांची 'रानबाजार' या वेबसीरिजने इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजवली होती. प्रेक्षकांसह, शाम बेनेगल, एन. चंद्रा अशा अनेक मान्यवरांनी त्यांच्या या वेबसीरिजचे कौतुक केले. अनेक धाडसी, ज्वलंत, संवेदनशील विषयांना वाचा फोडणे, ही अभिजित पानसे यांची खासियत. या कारणामुळेच त्यांची कलाकृती ही नेहमीच इतरांपेक्षा हटके आणि सुपरहिट झाली आहे. आता ते प्लॅनेट मराठीसोबत जोडले गेल्यामुळे येत्या काळात प्लॅनेट मराठीचा चढता आलेख पाहायला मिळणार आहे.
याव्यतिरिक्त अभिजीत पानसे यांचे रावण फ्युचर प्रोडक्शन्स आणि श्रीरंग गोडबोले यांचे इंडियन मॅजिक आयने एकत्र येऊन, प्लॅनेट मराठीच्या सहकार्याने प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणि भन्नाट घेऊन येण्यासाठीही सज्ज झाले आहेत. याबाबतची घोषणा त्यांनी नुकतीच केली असून येत्या काळात प्रेक्षकांना 'रानबाजार २' आणि जयवंत दळवी यांच्या 'पुरुष' या नाटकावर प्रेरित होऊन एक नवीन वेबसीरिज प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.
या नियुक्तीबद्दल अभिजित पानसे म्हणतात, '' हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये जसे एकमेकांचे हात पकडून भव्यदिव्य कलाकृती निर्माण केली जाते. तसे मराठी इंडस्ट्रीमध्ये फार कमी घडते. मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक जण स्वतंत्ररित्या काम करतात. फार कमी असे आहेत जे एकत्र येऊन काम करतात. त्यामुळे मराठीत जर अशी भव्यदिव्य कलाकृती निर्माण करायची असेल तर मराठी इंडस्ट्रीने एकत्र येऊन एखादी संघटना उभारणे गरजेचे आहे. याचाच आरंभ म्हणून मी आणि इंडियन मॅजिक आय एकत्र आलो. महाराष्ट्राच्या विविध भागांत असंख्य प्रतिभाशाली कलावंत आहेत, ज्यांना कलाकृती सादर करण्यासाठी, एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याच्या आमचा हा प्रयत्न आहे. अशा प्रकारचा मराठीतील पहिला स्टुडिओ उभारण्याचा आमचा मानस आहे. त्यात प्लॅनेट मराठी सारखे व्यासपीठ लाभल्याने हे अधिकच आनंददायी आहे.''
या नवीन उपक्रमाबद्दल दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले म्हणतात, '' मागील तीस वर्षांपासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे. यादरम्यान मला एक जाणवले, आजवर अनेक उत्तम कलाकृती सादर केल्या. परंतु त्या देशभर, जगभर पोहोचवण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतो. त्यामुळे आता प्लॅनेट मराठी सारख्या जगातील पहिले मराठी ओटीटीच्या, अक्षय बर्दापूरकर, अभिजित पानसे यांच्या सहकार्यांने आम्ही या मराठी कलाकृती जगाच्या पटलावर आणू.''
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' अभिजित पानसे डायरेक्टर कॉन्टेन्ट म्हणून रुजू झाल्यामुळे त्यांची जी मराठी इंडस्ट्रीबद्दलची दूरदृष्टी आहे, जी प्लॅनेट मराठीच्या विस्तारासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे, हे मी खात्रीने सांगू शकतो. त्यांच्यासोबतच तीन दशकांहून अधिक काळ या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारे श्रीरंग गोडबोले, ज्यांनी २५ हून अधिक मालिका केल्या आहेत. पाच चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. हा त्यांचा दांडगा अनुभव आमच्या पुढील वाटचालीसाठी नक्कीच उपयोगी येणार आहे. या सगळ्याच्या सहयोगानेच मराठीत एक मोठे युनिट उभे राहू शकते.''