हीच ती भूमिका जिने मला कणखर बनवले.... मृणाल कुलकर्णी म्हणतात एक नव्हे तर मिळाले दोन पुरस्कार
February 12, 2024
0
*हीच ती भूमिका जिने मला कणखर बनवले.... मृणाल कुलकर्णी म्हणतात एक नव्हे तर मिळाले दोन पुरस्कार*
छत्रपती शिवाजी महाराज*यांचा इतिहास ,पराक्रम ,स्वराज्यध्यास वाचत आणि पाहत घडलेल्या पिढीची मी पण एक भाग आहे. व्यक्ती म्हणून शिवराज्य समजून घेणे मला नेहमीच भावतं पण अभिनेत्री म्हणून मला शिवराज्याने जास्तच घडवले याचा अभिमान वाटतो .’महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३’ या झी टॉकीज वाहिनीने जाहीर केलेल्या पुरस्कार सोहळ्यात मला एक नव्हे तर दोन पुरस्कार दिले. पहिला पुरस्कार म्हणजे सुभेदार या सिनेमातील जिजाऊ आऊसाहेब जिजाबाई या भूमिकेसाठी प्रेक्षकांच्या पसंतीचा ‘महाराष्ट्राची फेवरेट सहाय्यक अभिनेत्री’ हा पुरस्कार तर दुसरा पुरस्कार म्हणजे शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब जिजाबाई यांची भूमिका साकारण्याची संधी हा माझ्यासाठी पुरस्कारापेक्षा कमी सन्मान नाही.”* अशा शब्दात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
‘*महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३*’ या पुरस्कार सोहळ्यात सुभेदार या सिनेमातील जिजाऊ आईसाहेबांच्या भूमिकेसाठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना प्रेक्षक पसंतीतून दिला जाणारा *महाराष्ट्राची फेवरेट सहाय्यक अभिनेत्री* हा पुरस्कार मिळाला. शिवराज अष्टक मालिकेतील पाचवे पुष्प असलेल्या ‘सुभेदार’ या सिनेमातील जिजाऊंच्या भूमिकेसाठी मृणाल कुलकर्णी स्पर्धेत होत्या. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी या भूमिकेला पसंतीचा कौल दिला आणि ‘*महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३*’ या पुरस्कारावर मृणाल कुलकर्णी यांचे नाव कोरले गेले.
१८ फेब्रुवारी २०२४ ला संध्याकाळी ७ वाजता ‘*महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३*’ हा सोहळा झी टॉकीज वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी टॉकीज वाहिनी दरवर्षी
*' महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? ‘* या पुरस्काराची घोषणा करते. त्यानंतर मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर प्रेक्षकांमध्येही ह्याचा उत्साह असतो. यंदाही झी टॉकीज वाहिनीने या पुरस्काराची घोषणा करत नामांकन यादी जाहीर केली होती. विविध १३ विभागातील नामांकने प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर *'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?'* या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांनी त्यांच्या मतांचा कौल देत दिला. प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल आणि जिजाऊंची भूमिका असा योग जुळून आल्यावर पुरस्कार तर मिळणारच, ही प्रतिक्रिया होती अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची . “या पुरस्काराने आनंद तर झालाच पण जबाबदारीही वाढली आहे.” असं मृणाल कुलकर्णी म्हणाल्या. *“येरे येरे पैसा या सिनेमातील भूमिके नंतर मला 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? २०२३ ‘ पुरस्काराच्या मंचावर सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार घेण्याची संधी मिळाली“* असेही अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या.
*“झी टॉकीज वाहिनीतर्फे ‘ महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? ‘ पुरस्कार मिळणे म्हणजे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणे हे समीकरण आहे याचाही मला आनंद आहे .ज्या शिवरायांना जिजाऊंनी घडवले त्या व्यक्ती, महिला म्हणून किती खंबीर आणि कणखर होत्या हे ही भूमिका जगताना मला कळाले. खऱ्या आयुष्यात या भूमिकेने मलाही कणखर बनण्याची प्रेरणा दिली आहे. जिजाऊंच्या आयुष्यातील तारुण्य ते वृद्धत्व अशा छटा साकारत असताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकलेल्या गोष्टी माझ्यासाठी शिदोरी आहेत. चित्रीकरणाचा अनुभव देखील खूप छान होता. गड किल्ल्यांवर काही प्रसंग चित्रित करताना, हे ते स्थान आहे जिथे शिवकाळ प्रत्यक्ष घडला ही भावना सुखावणारी आहे. अशा प्रकारच्या भूमिका मनावर कायम कोरलेल्या राहतील.”* अशी प्रतिक्रिया मृणाल कुलकर्णी यांनी दिली.